कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : उर्ध्व गोदावरी खोरे हे तुटीचे आहे, त्या पाण्यांचे कधीच वाटप होवु शकत नाही. गोदावरी खोरे प्रादेशिक पाणी वादात नगर-नाशिक शेतक-यांचा बळी देऊ नका, नसता शेतक-यांचा संघर्ष पाण्यानेही विझणार नाही. मायबाप शासनाने गोदावरी खो-यावर अवलंबुन असणा-या चाळीस टक्के शेतक-यांना उघडे नागडे पाडुन त्यांचे संसार उध्वस्त करू नये, अन्यथा सहकार संपुष्टात येवुन साखर कारखानदारीसह त्यावर अवलंबुन असणारी सर्व व्यवस्था उध्वस्त होईल असा इशारा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिला.
कृष्णा खो-यात पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे धडक निर्णय घेतले तोच नियम शासनाने गोदावरी खो-यातील शेतकरी जगविण्यासाठी लागु करून त्यास मोठया प्रमाणात निधी देवुन पश्चिमेचे समुद्राला वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे वळवून पाण्याची समृध्दी निर्माण करावी, शेतक-यांनी पाण्यांच्या लढयासाठी सज्ज रहावे असेही बिपीन कोल्हे म्हणाले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ विजयादशमीच्या मुहुर्तावर मंगळवारी संचालक सतिष आव्हाड, वैशाली आव्हाड या उभयतांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सर्व सभासद शेतक-यांना दस-याच्या सदिच्छा देत सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी जास्तीत जास्त खोडवे ठेवुन उस लागवडीवर भर द्यावा असे आवाहन केले. उपाध्यक्ष मनेष गाडे व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करताना म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचाराचा वारसा जपत आजवर सर्व संकटावर मात करत यशस्वी मार्गाक्रमण करत आहे. यंदाच्या हंगामात सुमारे ७ लाख टन उस गाळपाचे उद्दीष्टे ठेवले असुन त्यानुसार सर्व तयारी पुर्ण झाली आहे.
चालु वर्षी उसाची उपलब्धता कमी आहे तेंव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र शासनाकडे सर्व प्रकारच्या सध्याच्या इथेनॉल उत्पादीत दरांत आणखी पाच रूपयांची वाढ करून शेतक-यासह सर्वच घटकांना दिलासा द्यावा अशी मागणी बिपीन कोल्हे यांनी केली.
बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी उर्ध्व गोदावरी खो-यातील हक्काच्या पाटपाण्यासाठी सातत्याने संघर्ष करून येथील शेती आणि शेतकरी जगविण्यासाठी काम केले. चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यातील पाणी जायकवाडीत सोडण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. मेंढेगिरी समितीच्या सर्व शिफारशी हया चुकीच्या असुन समन्यायी पाणी वाटप कायदा बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांवर कायमस्वरूपी घाला घालणारा आहे.
खरीप हातचे गेले रब्बीचा भरोसा राहिलेला नाही, पाणी गेले तर शेतकरी पेटून उठतील. हे पाप उगाचच डोक्यावर घेवु नका. मायबाप सरकारने याप्रश्नांत वेळीच लक्ष घालावे अन्यथा यातुन होणारा संघर्ष न परवडणारा आहे. सहकारासमोर खाजगी कारखानदारीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. चालु वर्षी कशीबशी सहकारी साखर कारखानदारी चालेल पण पुढच्या वर्षी राज्यातील किती कारखान्यांची धुराडी पेटतील हा खरा प्रश्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे यांच्यासह सर्वांनीच साखर धंदा टिकविण्यासाठी महत्वपुर्ण पावले उचलली त्याबद्दल केंद्र व राज्य शासनाचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. सहकारातुन निर्माण होणारी आर्थीक समृध्दी शेतक-यांच्या दारापर्यंत देण्याचा महत्वपुर्ण निर्णय केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी कालच जाहिर केला हे एक धाडसी पाउल आहे.
सहकार हे ग्रामिण अर्थकारणाचे महत्वाचे अंग असुन त्याच्या जपवणूकीसाठी सर्वांनीच जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत. अन्यथा पुढच्या दहा वर्षात सहकारी चळवळ उध्दवस्त होउन शेतकरी देशोधडीला लागतील. ग्रामिण भागातील नेतृत्व संपुन जाईल. देशात कापड उद्योगानंतर साखर उद्योग दुस-या क्रमांकावर आहे. मात्र, त्यावर सातत्याने संकटे येवुन तो लयाला जाण्याची भिती आहे.
देशाची आर्थीक जडणघडणीत आय टी उद्योगाचे स्थान मजबूत होताना दिसत आहे, पण त्याची फळे ठराविक जणांनाच चाखायला मिळत आहे. ६० ते ६५ टक्के नागरिक हे शेतीवर अवलंबुन आहे. कच्चा माल शेतीतुनच निर्माण होतो तेव्हा शेतीसाठी पाणी आणि त्यानुरूप सुसंगत ध्येये धोरणांची अंमलबजावणी व्हावी अन्यथा शेतीवर अवलंबुन असणारी सर्व यंत्रणा उध्दवस्त होईल अशी भिती बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, डॉ. एकनाथ गोंदकर, कारखान्यांचे संचालक सर्वश्री. विश्वास महाले, बापू बारहाते, निलेश देवकर, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, आप्पा दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, रमेश घोडेराव, विलास वाबळे, त्रंबक सरोदे, संजय औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, अरूण येवले,
साईनाथ रोहमारे, शिवाजी वक्ते, प्रदिप नवले, संजय होन, रिपाईचे दिपक गायकवाड, बाबा डांगे, कामगार नेते मनोहर शिंदे, गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, त्यांचे सर्व संचालक, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे, विवेककुमार शुक्ला, विश्वनाथ भिसे, सचिव तुळशीराम कानवडे, विविध संस्थांचे आजी माजी संचालक पदाधिकारी, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, सभासद शेतकरी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.