आंदोलकांच्या रेटयामुळे एसटीवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ
शेवगाव प्रतिनिधी, दि.२६ : सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीवरून शिर्डी येथे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने पंतप्रधानाच्या सभेसाठी शेवगाव तालुक्याच्या गावागावात पाठविण्यात आलेल्या एसटी बसेस आंदोलकांच्या रेटयामुळे रिकाम्याच परतण्याची वेळ आली.
येथील हसनापूर, कोळगाव, मंगरूळ, अंतरवाली, ढोरजळगाव आदि गावात पाठविलेल्या बसमध्ये एकही व्यक्ती न बसल्याने रिकाम्याच परतल्या. या बसेस नियोजित गावात जाऊन थांबल्या. मात्र, त्या मध्ये दोन संयोजक कर्मचाऱ्या शिवाय कोणी ग्रामस्थ बसला नाही. उलट पक्षी गावातील कोण बस मध्ये चढतो का याची टेहळणी करणा-याची मोठी गर्दी असायची.
पंतप्रधानाच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमविण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याने बुधवार दुपारपासूनच एसटी बसेस रिकाम्याच आपल्या नियोजित गावाकडे धावू लागल्या. त्यामुळे शेवगाव आगाराचे रोजचे वेळापत्रक बिघडले. कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामीण भागात फेर्या मारणाऱ्या गाड्या ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, तालुक्याच्या ठिकाणी शेवगावी नोकरी धंद्या निमित्त रोज एसटी बसने येजा करणाऱ्या हजारो पासधारका सह स्त्री पुरुष वृद्ध प्रवाशाचे मोठे हाल झाले. अवैध प्रवासी वाहन चालकानी मात्र, ही पर्वणी कॅश केली. रात्री उशीरा पर्यंत तिप्पट चौपटीने भाडे मोजून अडलेल्या प्रवाशांना घर जवळ करावे लागले. याबद्दल सर्वच स्थरातून नाराजी व्यक्त होत होती.
शेवगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून काही जणांसह शिर्डीकडे निघालेल्या काही बसेस भातकुडगाव फाट्यावर आंदोलकांनी अडवल्याने पुन्हा त्या गावी परत पाठविण्यात आल्या. या सुमारे ४० एसटी बस गाड्या शहरातील पाथर्डी रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात लावण्यात आल्या.
गुरुवारच्या कार्यक्रमासाठी शिर्डी येथे जाण्यासाठी शेवगाव आगारात गेवराई, येथून २० तसेच धारूर व माजलगाव आगारातून प्रत्येकी १८ अशा एकूण ५६ एसटी बसेस आल्या होत्या. त्या तालुक्याच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्रीच नियोजित गावा गावात पाठविण्यात आल्या. मात्र, गावागावात सकल मराठा समाज व त्यांना पाठींबा देणारे रस्त्यावर उतरून आक्रमक झाले. या जमावाने त्या एसटी बसेस शांततेच्या मार्गाने अडवल्या. यावेळी सभेस जाणाऱ्या इच्छुकांनी देखील कोणताही विरोध न करता उतरून घेतले.
मात्र, तालुक्यातील मंगरूळ येथे आलेल्या एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २१५ ८ बसच्या मागील बाजूची काच जमावाने फोडल्याची घटना घडली असून काही ठिकाणी बस वर चिकटविलेले सभेचे पोस्टर फाडून आपला संताप व्यक्त केला.