शेवगाव तालुक्यातील २७ पैकी १६ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच कारभारी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०८ : नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकी झाल्या. शेवगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल २७ गावच्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. यानिमित्ताने लक्ष्मी दर्शन येथे सर्वाधिक अर्थपूर्ण झाले, त्यामुळे निवडणुका कोणत्याही असो साध्या राहिल्या नाहीत. याचे प्रत्यंतर आले. त्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मर्यादित मतदार असल्याने विजयाचा कौल लक्षात घेऊन एककेकांचे मताचे वाढते मोल लक्षात घ्यावे लागते. तालुक्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर २७ गावच्या निवडणुका झाल्याने आता शेवगावकरांची दिवाळी गोड होणार आहे.

पेठेत चलन फिरल्याने बाजारपेठ सजली आहे. या काळात उमेदवाराच्या जथ्यात नुसते त्यांच्या समवेत मागेपुढे फिरण्याचा भाव वीस पंचवीस हजाराच्या घरात पोहोचला. दिवसभर खाण्यापिण्याची व्यवस्था वेगळी असे. याशिवाय प्रत्यक्ष मतदानाचा भाव वेगळा होता. मतदाराचा हिसका, त्यात कार्यकर्त्याचा अतिउत्साह ही नडला. एवढे करून देखील मतदार कोणाला चुना लावेल याचे गणित अनेकांना उमजले नाही. यावेळी असाच एक किस्सा घडला.

त्यात कार्यकर्त्याचा अति उत्साह देखील नडला. असा प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये अशी हळवळ करणारेही भेटलेत. मतमोजणी कक्षातील उत्साही कार्यकर्त्यांकडून आकडेवारी मध्ये हाच्चे धरण्यातून घोळ झाला. अति उत्साही कार्यकर्त्यांचा मतदान कक्षातच आपला उमेदवार निवडून आल्याचा इशारा झाला. मतदान कक्षातच जल्लोषाचे घुमारे फुटले. उमेदवाराकडे अर्थपूर्ण खाणेसुमारी होतीच. त्यामुळे त्यानेही अधिकृत निकालाची प्रत घेईपर्यंत उसंत खाल्ली नाही. बाहेर वाद्य, गुलाल तयार होताच. 

गावातही निरोप पोहोचताच तेथे जंगी स्वागत व मिरवणूकीच्या जल्लोषाचे नियोजन झाले. एका कार्यकर्त्यांनी तर डीजे मागविण्याचा हट्ट धरला. तो ही पुरा करण्याचे ठरले होते. मात्र, थोड्यावेळाने अधिकृत निकाल जाहीर झाला त्यात दुसराच उमेदवार ३९ मताने विजयी झाल्याचे जाहीर झाले. हे मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना मोबाईलवर अनेकजण सांगत होते. मात्र, धुंदीतील कार्यकर्ते ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर काही कार्यकर्ते गावात गेल्यानंतर मिरवणूक थांबली.

किंग मेकरचा बोलबाला यावेळी काही किंगमेकर यांनी बाजूला राहून निवडणुकीचे फासे असे आवळले की त्यांनी समोरच्या भल्या भल्यांना आसमान दाखविले. तर काही जण स्वतः सत्तेत सहभागी झाले. त्यांनी अनेक मोठ्या गावात आपली किमया दाखविली. त्यामुळे अनेक ठिकाणी मातब्बराच्या सत्तेला सुरुंग लागून तेथे सत्तांतर घडून आले. अव्हाणे ग्रामपंचायती वर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी गेल्या २५ वर्षा पासूनची ग्रामपचायतीवरील एकहाती सत्ता कायम ठेवली. 

या वेळी त्यांना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव भुसारी, माजी उपसभापती अंबादास कळमकर यांनीही त्यांना मदत केली. बालमटाकळी मध्ये भाजपचे बिनीचे कार्यकर्ते तुषार वैद्य यांची सत्ता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती रामनाथ राजापुरे यांनी १४ पैकी सरपंच पदासह ११ जागा मोठ्या मताधिक्यांनी काबीज करून सत्तांतर घडविले. मुंगीत बाजार समितीचे माजी संचालक, राष्ट्रवादीचे राजेंद्र ढमढेरे व श्रीमंत गव्हाणे यांनी बाजी मारली.

बोधेगाव ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद सदस्य, भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन काकडे यांनी अनेकांना बाजूला सारून सरपंच पदी सरला महादेव घोरतळे यांना निवडून आणले. डुले बुद्रुकला देखील भाजपचे तालुका सचिव भीमराज सागडे यांनी राष्ट्रवादीच्या सतेला सुरुंग लावून सरपंच पदासह ग्रामपंचायत ताब्यात घेतली. लाडजळगावला भाजपचे अंबादास ढाकणे अतितटीच्या तिरंगी लढतीत मोठ्या फरकाने निवडून आले.

शहरटाकळीला राष्ट्रवादीच्याच आंतर्गत दोन गटात झालेल्या लढतीत कृ. ऊ. बाजार समितीचे माजी सभापती अॅड अनिल मडके यांनी भाकरी फिरून सत्ता आपल्या गटाकडे खेचली आहे. एरंडगाव भागवत ग्रामपंचायतीत मनसेचे गोकुळ भागवत यांचे नेतृत्वा खाली सलग तिसऱ्यांदा सरपंच पदी विजय मिळवून हॅट्रिक केली. या निवडणूकीत माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे, अॅड शिवाजी काकडे, प्रणित जनशक्तीने तीन ग्रामपंचायतीने झेंडा फडकवला असून वंचित बहुजन आघाडीने देखील विविध ग्रामपंचायती मधील १८ सदस्यपदी यश मिळवले, असून बोधेगावी संगिता ढवळे यांनी सरपंच पदासाठी लक्षणीय लढत दिली.

महिलांचा टक्का वाढला शेवगाव तालुक्यातील २७ पैकी १६ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच म्हणून गाव कारभारी झाल्या. तर ११ पंचायतीमध्ये पुरुष सरपंच झाले आहेत. आरक्षणामुळे ही संधी त्यांना चालून आली तशी ती सामान्यातल्या सामान्यांना देखील मिळाली आहे. निवडणूक काळात निवडणूक परिस्थितीचे अवलोकन करण्यास गेलेल्या पत्रकारास एका गावातील सरपंच उमेदवार भेटू शकला नाही.

महत्वाच्या कामानिमित्त ते काहीवेळ बाहेर असल्याचे समजल्यांने आतापासून कामात व्यस्त असलेल्या सरपंचाबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाल्याने त्यांनी त्यांची अधिक चौकशी केली असता. त्या उमेदवाराची ती वेळ दारूची भट्टी पाडण्याची होती असे समजले. विशेष म्हणजे तो उमेदवार निवडून आला आहे. कारण तो अशाच एका मातब्बर किंगमेकरचा कार्यकर्ता आहे.