दैत्यांचा संहार करणाऱ्या देवीला चोरांचा गंडा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : मढी शिव रस्त्यावरील लक्ष्मण जेऊघाले यांच्या वस्ती वर असलेल्या कालीकामाता मंदिराचा कोयंडा तोडून चोरांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील देवीच्या गळ्यातील मंगळसुत्र, चांदिचा टोप, दानपेटी चोरून नेल्याने कोळपेवाडी परिसर चोरट्यांच्या उपद्रवाने पुरता हैराण झाला आहे. 

कोळपेवाडी मढी-शिव रस्त्यावर लक्ष्मण जेऊघाले यांनी त्याच्या वस्ती वर नऊ वर्षांपूर्वी कालीकामाता मंदीराची उभारणी करुन, गाभाऱ्यात कालिकामाता तुळजाभवानी व लासुरची देवी प्रतिष्ठापना केलेली, असल्याने भाविक भक्तांची मंदिरात नेहमीच वर्दळ असते. बुधवारी सकाळी जेऊघाले देविची पुजा करण्यासाठी मंदिरात गेले असतांना त्यांना मंदिराचा दरवाजा कोंडा तोडलेला आढळून आला.

परिसरात चोरींची घटना समजताच भाविकांनि मंदिर परिसरात मोठी गर्दी केली. देवतांच्या सेवेकरी यांनी सांगितले कि भाविकांनी दिलेल्या दानातुन तिनही मातेच्या गळ्यात असणारे सोन्याचे मंगलसुत्र, एकवीस भार चांदीचा टोप, पाळणे व एक वर्षांपासून न उघडलेली दान पेटी वर चोरट्यांनी जवळपास लाखोंचा ऐवज चोरुन नेल्याने भाविकामध्ये पोलीस प्रशासनाबद्दल कमालीचा अंसोतोष पसरला आहे.

या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेगाव शिवारातील सहाचारीला खेटून असलेल्या दिपक वंझे यांच्या वस्ती वरील महालक्ष्मी मंदिराला चोरट्यांनी लक्ष करत देवीच्या गळ्यातील एक तोळ्याची पोत, नऊभार चांदीचा टोप, कानातील झुबे, चांदिचे पाळणे, दान पेटी घेवुन पोबारा केला.

मागील वर्षी कोळपेवाडी पंचक्रोशीचे आराध्यदैवत महेश्वर मंदिरातील दान पेटी फोडून त्या मधील रक्कम चोरट्यांनी लंपास केलेल्या घटनेला एक वर्षे न उलटताच परिसरातील दोन मंदिराना चोरट्यांनी आपले सावज बनवत लाखोंच्या पुढे मुद्दे माल चोरुन नेला आहे. परिसरात घडलेल्या एकही गुन्हाचा तपास पोलीस यंत्रणेला लावण्यात आलेले अपयश हे गुन्हेगारीला उत्तेजन देणारे ठरत आहे. कोळपेवाडी पोलीस औट पोस्ट नेहमीच बंद असल्याने परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत असतात.