कोपरगाव मतदारसंघात ८ ग्रामपंचायतींमध्ये कोल्हे गटाचा दणदणीत विजय

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ८ ग्रामपंचायतींमध्ये कोल्हे गटाने दणदणीत विजय मिळवून या ग्रामपंचायतींची सत्ता काबिज केली आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील बहुसंख्य मतदार संख्या असणाऱ्या गावातील ग्रामपंचायती कोल्हे गटाने आपल्याकडे खेचून घेत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील एकूण २१ ग्रामपंचायतींची निवडणूक ५ नोव्हेंबरला झाली. ६ नोव्हेंबरला या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्या असल्याचा दावा काळे गटाने केला, असला तरी कोल्हे गट काळे गटापेक्षा वरचढ असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. या निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील ५४.१६ टक्के मतदान असलेल्या गावात कोल्हे गटाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

तुलनेत काळे गट सरपंच संख्येत पुढे दिसत असला तरी फक्त ४१.४१ टक्के मतदान असलेल्या गावांतच काळे गटाचे सरपंच असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत कोल्हे गटाने कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव, बोलकी, धोत्रे तसेच कोपरगाव मतदारसंघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील वाकडी, चितळी, पुणतांबा-रस्तापूर या सहा ग्रामपंचायतींची सत्ता स्वबळावर आपल्याकडे खेचून घेतली आहे. तर पोहेगाव (बु.) ग्रामपंचायतमध्ये कोल्हे-औताडे युतीची सत्ता आली आहे.

पोहेगावसह बहुतांश ठिकाणी मतदारांनी काळे गटाला स्पेशल नाकारल्याचे चित्र आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळविले आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कोल्हे गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, कोल्हे गटाचे सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार बहुमतांनी विजयी झाले आहेत. या निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी मतदारांनी काळे गटाच्या उमेदवारांचा पराभव करून जोरदार धक्का दिला आहे.

युवा नेते विवेक कोल्हे यांच्या कुशल व जादुई नेतृत्वाचा करिश्मा या ग्रा. पं. निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आला आहे. विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आ. आशुतोष काळे यांना जोरदार आव्हान देत या दोन्ही नेत्यांच्या गटाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली आहे. विवेक कोल्हे यांनी ब्राह्मणगाव, बोलकी, धोत्रे, पोहेगाव यासारख्या महत्त्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायतींवर वरचष्मा मिळवून आ. काळे यांना नामोहरम केले असून, राहाता तालुक्यातील पण कोपरगाव मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पुणतांबा-रस्तापूर, वाकडी, चितळी या तीन ग्रामपंचायतींमध्ये विखे यांच्या गटाला पराभवाची धूळ चारत विखेंना ‘जोर का झटका’ दिला आहे. 

यामध्ये काळे गट मागे असून, फक्त ४१.४१ टक्के मतदान असलेल्या गावांतच काळे गटाचे वर्चस्व असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी कोल्हे गटाचे सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार कमी मतांनी पराभूत झाले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींचे सरपंच पद काळे गटाकडे गेले असले तरीही त्या ठिकाणी कोल्हे गटाचे ग्रा. पं. सदस्य मोठ्या मताधिक्याने व अधिक संख्येने निवडून आले आहेत. कोल्हे गटाने ग्रा. पं. सदस्य संख्येत वर्चस्व सिद्ध केले आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला असता, अनेक ठिकाणी मतदारांनी सत्तांतर घडवले असून, कोल्हे गटाच्या उमेदवारांना पसंती देत आपली मते त्यांच्या पारड्यात टाकल्याचे दिसून येत आहे. त्यावरून मतदारसंघातील जनता कोल्हे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच कसे वरचढ ठरलो हे सांगण्याचा प्रयत्न काळे गटाकडून होत असला तरी प्रत्यक्षात जनमानस व या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल लक्षात घेता वस्तुस्थिती वेगळी असल्याचे दिसते. या निवडणुकीत मतदारांनी कोल्हे गटाच्या उमेदवारांना केलेले मतदान पाहता कोल्हे गटाची ताकद वाढल्याचे स्पष्ट होत आहे.