श्री स्वामी समर्थ बचत गटाकडून 25% लाभांषाचे वाटप

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : तालुक्यातील शहर टाकळीतील श्री स्वामी समर्थ बचा गटाने आपल्या सभासदाना दिवाळीचे औचित्य साधून २५ टक्के लाभांषाचे वाटप केले आहे. पंधरा तरुणांनी एकत्र येत मैत्रीचा धागा बचत गटाच्या माध्यमातून जपणूक करत साधलेली आर्थिक प्रगती व मदतीची भावना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. सन 2022 /23 या आर्थिक वर्षासाठी श्री स्वामी समर्थ बचत गटाने झालेल्या नफ्यावर 25% लाभांश सभासदांच्या बँक खात्यावर जमा करून दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला.

सन 2013 मध्ये अवघ्या पन्नास रुपये मासिक वर्गणीच्या माध्यमातून 15 मित्रांनी एकत्र येत श्री स्वामी समर्थ बचत गटाची स्थापना केली पुढे 2017 मध्ये नाबार्डच्या माध्यमातून शेती उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य सुरू ठेवले. रोजी बचत गटाचे 10 लाख 99 हजार 250 इतके स्वभांडवल जमा झालेले. असून चालू आर्थिक वर्ष अखेर 22 लाख 38 हजार 338 रुपयाचे कर्ज वाटप व त्या माध्यमातून तीन लाख 92 हजार 626 रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे.

त्यावर 25 टक्के लाभांश याप्रमाणे प्रत्येक सभासदाच्या खात्यावर प्रत्येकी सात हजार रुपये याप्रमाणे एकूण 98 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष संतोष अडकिते व सचिव  प्रदीप मडके यांनी दिली. या वेळी बचत गटाचे  प्रशांत वेलदे संतोष भालेराव, दत्तात्रय म्हस्के, उमेश वैद्य, सोमनाथ गादे, अरुण लोखंडे, संजय जाधव, संजय अडकिते, विलास काकडे, राजेंद्र दारकुंडे, संतोष गादे अशोक नांगरे कृष्णा पवार उपस्थित होते.

या बचत गटातील सदस्याच्या माध्यमातून एक लाख 40 हजार रुपयांचा इमर्जन्सी निधी संकलित केला असून सदर निधीचा वापर सभासदाच्या अति तातडीच्या गरजेसाठी, आजारपणासाठी बिनव्याजी कर्ज देऊन केला जातो. बचत गटातील सदस्याच्या प्रथम पाल्याच्या लग्नासाठी पंचवीस हजार रुपये देऊन कन्यादान योजना राबविण्यात येते आहे.

गटातील सर्व सदस्यांचा आरोग्य विमा उतरवलेला आहे. प्रत्येक सभासदास खरीप व रब्बी हंगाम साठी 50 हजार ,व्यवसायासाठी एक लाख तर तातडीचे 50 हजार अशी कर्ज मर्यादा ठरवण्यात आली असून सदर कर्जासाठी व्याजदर अवघा दीड टक्का  आहे.गटातील सर्व सदस्य प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवतात.