स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसतोड कामगारांच्या कोप्यामध्ये जाऊन त्यांची दिवाळी केली गोड

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ :  येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दिवाळीच्या दिवशी केदारेश्वर व गंगामाई साखर कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड कामगारांच्या कोप्यामध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना साखर, पामतेल, गूळ, आदि वस्तूंबरोबर फटाके व मिठाईचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. स्वाभिमानीचा दिवाळी फराळ हातात पडताच ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलाबाळांसह कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुक्यातील पदाधिकारी सदस्यांनी ऊसतोड कामगारांचे प्रबोधन करून स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार शंभर रुपये प्रति टन भाव जाहीर होईपर्यंत तसेच ऊसतोड कामगारांच्या संपातही समाधानकारक तडजोड होऊन ऊसतोड कामगारांना भाव वाढ मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ऊस तोडण्यासाठी बाहेर पडू नये याबाबत प्रबोधन केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, संदीप मोटकर, मच्छिंद्र, मेजर अशोक भोसले, बाळासाहेब फटांगडे अमोल देवडे उपस्थित होते.