शेवगाव तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे ७९.४३ टक्के मतदान

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : शेवगाव तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे ७९.४३ टक्के मतदान झाले. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १३ हजार १९५ पुरुष तर १२ हजार ७ महिला अशा एकूण २५ हजार १५७ मतदारापैकी १० हजार ७३२ पुरुषांनी तर ९ हजार २५१ महिलांनी अशा एकूण १९ हजार ९८३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंदिस्त केले.

सकाळी ७.३० ला मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९.३० पर्यंत पहिल्या दोन तासात केवळ १४.२१ टक्के मतदान झाले. दुपारी मतदानाचा वेग सुधारला. दुपारी ३.३० ला ६९.४३ टक्के मतदान झाले. तालुक्यात ७९.४३ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार छगन वाघ, नायब तहसीलदार मयुर बेरड यांनी दिली. सर्व ठिकाणी मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

ग्रामपंचायत निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे – रांजणी ८५.२६ टक्के, जोहरापूर ७९.२३, दहीगाव ने ६३.०२, खामगाव ८९.१७, खानापूर ८७.९९, भायगाव ८९.१०, रावतळे कुरुड्गाव ८८.९३, अमरापूर ८३.५९, सुलतानपूर खुर्द ८०.९०, वाघोली ८७.१२, प्रभूवाडगाव ८६.९४, तर आखेगाव ८०.९६ टक्के. सर्वत्र उत्सहाने मतदान झाले.

रांजणी येथे झालेल्या किरकोळ कुरबुरीनंतर शांततेत मतदान झाल्याची माहिती पोलीस ठाण्यातून सांगण्यात आली. दहीगाव ने येथे माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

ग्रामपंचायत निवडणूक पार पडणाऱ्या तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस पथकास होमगार्ड जवानांनी बंदोबस्तासाठी सहाय्य केले.

मंगळवारी मतमोजणी होणार असून यंदाच्या निवडणुकीत गावचे सरपंच पद हे जनतेतून निवडले जाणार असल्याने जवळपास सर्वच ठिकाणी सरपंच पदासाठी अनेकानी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे गावच्या सरपंच पदावर कोण विजयी होणार? याबाबत संबधित गावासह तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.