बांगला देश भारता मुळे स्वतंत्र झाल्याची भावना तेथील नागरिकांची आहे – काटे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : परदेशातील पोलिसांनी आम्हाला एस्कॉर्ट केले, तेथील एक नव्हे तीन खासदारांनी आमच्या सन्मानार्थ स्वतःच्या घरी स्नेहभोजन देवून स्वतःचे पाहूणे समजून घरीच निवासाची व्यवस्था केली. त्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या स्वीय सहाय्यकला पाठवून आमच्या प्रवासात काही तकलीफ तर झाली नाही ना? याची तसेच काही हव नको याची आस्थेने विचारपूस केली. एवढ्या व्हीआयपी पाहुणचाराने आम्ही सर्वजण भारावलो. भारतीया बद्दल बांगला देशातील नागरिकांच्या मनातील आपुलकी ठायी प्रतित होत होती.

नगरचे स्नेहालय आयोजित भारत बांगला सद्भावना यात्रेमुळे हा योग जुळून आला. येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष, सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी भागनाथ काटे मोठ्या उत्साहात एका दमात सांगत होते. स्नेहालय आयोजित भारत बांगला सद्भावना सायकल यात्रेद्वारे जवळपास बाराशे किलोमीटर सायकल प्रवास करत बांगला देशातील नवखाली जिल्ह्यातील महात्मा गांधी ट्रस्ट मध्ये आयोजित कार्यक्रमात सहकऱ्या समवेत सहभाग घेऊन नुकतेच परतलेले काटे बोलत होते.

काटे म्हणाले, बांगला देश भारता मुळे स्वतंत्र झाल्याची भावना तेथील नागरिकांची असल्याने आदरातिथ्यात कुठेही कंजुषी झाली नाही. या सद्भावना यात्रेत एकूण ८६ स्वयसेवक सहभागी झाले. त्यात नगर जिल्ह्यातील ३० तर शेवगावातील ४ जणाचा सहभाग होता. येथील सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी भागनाथ काटे प्रा डॉ. गजानन लोंढे उचल फाउंडेशनचे सचिन खेडकर, डॉ. संजय लड्डा व स्नेहालयाचे प्रवर्तक डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा तेरा वर्षाचा मुलगा कौस्तुभ सर्वांच्या पुढे होता.

सद्भावना यात्रेत विविध देशांचा सहभाग लाभला. नेपाळ, भूतान, इंग्लंड सह कलकत्ता, आसाम येथील काही जण होते. रत्नागिरीच्या सुरेखा गावस्कर, मुंबईच्या स्वाती भटकळ, हिवरेबाजारचे भाग्यविधाते पोपट पवार, स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, अॅड. शाम असावा संतोष धर्माधिकारी, विलास सुतार आदी समवेत कलकत्त्यातून सोनाई मुरी या बांगलादेशाच्या सरहद्दीच्या गावापर्यंत ४००किलोमीटर सायकल प्रवास केला.

बांगलादेशात जाण्यासाठी तेथील व्हिसा अगोदर काढण्यात आला होता. सोनाई मुरीपासून सोना मस्जीद, महात्मा गांधी ट्रस्टमध्ये पोहचे पर्यंतच्या ८०० किलोमीटर पैकी काही प्रवास गंगा नदीच्या जलमार्गातून करायला मिळाला. या प्रवासासाठी कलकत्ता लायन क्लबने सद्भावना यात्रेकरुना ५२ सायकली पुरविल्या होत्या.

त्या परतीच्या वेळी ढाक्यातील लायन क्लबला देण्यात आल्या. या सद्भाव रॅलीमध्ये बंगलादेशात ठिकठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बांगलादेशाचे पोलीस पथक एस्कॉर्ट करत तर प्रवासा दरम्यान त्या भागातील तेथील खासदार आवासीलीग सल्लीमुद्दिन शिमूल, खासदार नूरूझामन बिस्वास यांनी मोठ्या आस्थेने आदरातिथ्य केले.

स्वत:च्या निवासस्थानी स्नेहभोजन देऊन सद्भावना यात्रेकरूंची आपल्या निवासस्थानी निवासाची सोय देखील केली. तर पंतप्रधान वंग बंधू कन्या हसिना बानो यांनी स्वीय सहाय्यकाला पाठवून सर्वांना वंग बंधूच्या ग्रंथाची भेट देवून प्रवासात काही तकलीफ तर झाली नाही ना याची आस्थेने चौकशी केली.