शेवगाव प्रतिनिधी, दि.२१ : यंदाच्या गळीत हंगामासाठी परिसरातील साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार शंभर रुपये प्रति टन जाहीर करावी. या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार प्रशांत सांगडे, साखर संचनालय कार्यालयाचे लेखापरीक्षक भारत टेकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत मंगळवारी झालेल्या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही.
दरम्यान या विषयी साखर सहसंचालक व जिल्हाधिकारी यांनी बुधवारी (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित केली आहे. मात्र, याही बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही. तर, शेवगाव तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यंदाच्या गळीत हंगामात परिसरातील साखर कारखान्यांकडून प्रति टन तीन हजार शंभर रुपये भाव जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्धार बैठकीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जाहीर केला.
तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रति टन २७०० रुपये प्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. तर गंगामाई सहकारी साखर कारखान्याने प्रति टन २७०० रु. व बैलगाडीने ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन २७५० प्रमाणे पहिली उचल जाहीर केली असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कारखान्यांच्या प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.
चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, उपाध्यक्ष दत्ता फुंदे, मच्छिंद्र आरले, संतोष गायकवाड, तालुकाध्यक्ष मेजर अशोक भोसले, बाळासाहेब फटांगडे, माऊली मुळे, संदीप मोटकर, भीमराव बटुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला तालुकाध्यक्ष बाईजाबाई बटुळे, बाळासाहेब गर्जे, रामेश्वर शेळके, आदिसह स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते, परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच गंगामाई साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अर्जुन मुखेकर, शेतकी अधिकारी रमेश कचरे, आबासाहेब झिरपे, ज्ञानेश्वरचे शेतकी अधिकारी सुरेश आहेर, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के, केदारेश्वरचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे आदींनी चर्चेत सहभाग घेतला .