शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बोधेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संग्राम नितीन काकडे यांची एक मताने निवड जाहीर करण्यात आली. बोधेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नितिन काकडे गटाच्या सरला महादेव घोरतळे यांनी १८९ मतांची अघाडी घेत सरपंच पदावर मोहर उमटवली होती. परंतु उपसरपंच पदासाठी आवश्यक असलेला सदस्यांचा आकडा पार करता न आल्याने उपसरपंच पदाची बाजी कोण मारणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते.
बोधेगाव ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादीला नऊ, नितिन काकडे गटाला सात, तर वंचित एक जागा मिळाल्याने आणि सरपंच पदाला मतदानाचे दोन अधिकार देण्यात आल्याने याठिकाणी चौरस निर्माण झाली होती. वंचित तटस्थ राहिल्यास राष्ट्रवादी आणि काकडे गटाकडे गेल्यास त्यांचा उपसरपंच होत असल्याने वंचितच्या उमेदवाराला महत्व प्राप्त झाले होते. परंतु या रस्सीखेचीत वंचितच्या शायदा युन्नूस सय्यद यांना आपल्या बाजुने वळवण्यात काकडे गटाला यश आले.
६८८२ मतदार आणि १७ उमेद्वार असलेल्या बोधेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी काकडे गटाकडुन संग्राम नितिन काकडे यांचा उमेद्वारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यांना सुचक म्हणून मयुर अनिल हुडेकरी, राष्ट्रवादी गटाकडुन राम मोहन आधारे यांना सुचक राहुल भरत गोरे, तर तिसरा सुमन कचरू गर्जे यांना सुचक सुरेखा सुनिल गायके होते. या तीन दाखल अर्जातून सुमन गर्जे यांनी माघार घेतल्याने काकडे आणि अंधारे यांच्यात मतदान घेण्यात आले.
दोघांना नऊ-नऊ मतदान झाल्यानंतर सरपंचाच्या एक मताच्या अधिकाराने संग्राम काकडे यांना विजयी घोषित करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून शेवगावचे मंडळ कृषि अधिकारी प्रशांत टेकाळे होते. त्यांना ग्राम विस्तार अधिकारी सुनिल गोरे यांनी मदत केले. तर निवडणुक सुरळीत पार पाडण्यासाठी बोधेगाव पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक भास्कर गावंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. उपसरपंचपदी संग्राम नितिन काकडे यांची निवड झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांना उचलुन घेत मिरवणुक काढली.