कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : गोदावरी उजव्या कालव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या योजनेतून धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, सदर योजना नादुरुस्त असल्यामुळे उजनी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ तातडीने सुरू करून त्यातून धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद येथील पाझर तलाव भरून द्यावेत, अशा मागणीचे निवेदन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (२८ नोव्हेंबर) गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद या गावांना गोदावरी उजव्या कालव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजीपी) योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सदर योजना नादुरुस्त असल्यामुळे धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद या गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यामुळे उजनी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ तातडीने सुरू करून त्यातून धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद येथील पाझर तलाव भरून द्यावेत, जेणेकरून या तिन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. प्रशासनाने तात्काळ यासंबंधी कार्यवाही करावी, अशी मागणी युवा नेते विवेक कोल्हे यांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे केली.
दरम्यान, कोपरगाव तालुक्यातील राज्यमार्ग-६५ या रस्त्याअंतर्गत झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख हा तालुका हद्दीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशा मागणीचे निवेदन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले यांना मंगळवारी देण्यात आले. कोपरगाव, चांदेकसारे, झगडे फाटा, पोहेगाव, जवळके, रांजणगाव देशमुख, तळेगाव दिघे, संगमनेर (राज्यमार्ग-६५) या रस्त्यावर झगडे फाटा ते रांजणगाव देशमुखदरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
रस्ता अतिशय खराब झाला असून, त्यामुळे शेतकरी, दूध उत्पादक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांना या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून, रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
सदर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील ग्रामस्थांकडून केली जात आहे, पण त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तहसीलदारांनी या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न त्वरित मार्गी लावा, अशी आग्रही मागणी युवा नेते विवेक कोल्हे यांनी केली. त्यावर तहसीलदार संदीप भोसले यांनी सावर्जनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व्ही. बी. शिंदे यांना मोबाईलवर संपर्क साधून हे काम तातडीने मार्गी लावण्याची सूचना केली. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार संदीप भोसले यांनी शिष्टमंडळास दिले.
यावेळी वाल्मिक नेहे, गोविंद दरेकर, बाळासाहेब काकडे, जवळके ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील थोरात, एकनाथ दरेकर, बाळासाहेब थोरात, महेश थोरात, शांताराम नेहे, संदीप थोरात, परसराम शिंदे, अरुण थोरात, बाबासाहेब नेहे, विजय शिंदे, संतोष थोरात, गंगाराम दरेकर यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.