सोमैया महाविद्यालयातील १७६ विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये महाविद्यालयातील 176 विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रो.(डॉ.) एस.आर.पगारे यांनी दिली. यामध्ये एपिक सर्व्हिसेस पुणे व फिनड्राईव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपन्यांचा समावेश आहे.

यावेळी एपिक सर्व्हिसेस पुणेचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख यास्मिन शेख, फिनड्राईव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख माधुरी पुजारी, देवश्री मोरे यांनी विद्यार्थ्यांची लिखित व मौखिक परिक्षा तसेच ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून निवड केली आहे. या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेपूर्वीच आपली नियुक्ती पत्रेही कंपनीच्या वतीने सुपूर्द करण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेच्या समाप्तीनंतर नियुक्त झालेल्या पदावर रुजू व्हायचे आहे.

निवड झालेले हे तालुक्यातील एकमेव महाविद्यालय आहे. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील तृतीय वर्षातील विविध विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाच्या वतीने आजपर्यंत विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू झालेले, असुन त्यामध्ये अनेक विद्यार्थ्याना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे.

महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य-प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडून मुलाखतीची तयारी करून घेतली जाते आणि त्यानंतरच विविध कंपन्यांचे मानव संसाधन अधिकारी यांना महाविद्यालयात आमंत्रित करून अशा प्रकारचे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले जाते. प्लेसमेंट विभागातून निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोक रोहमारे, सचिव मा. ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून रोजगार प्राप्त करून देण्यामध्ये महाविद्यालयाचा प्लेसमेंट विभाग सतत अग्रेसर असतो. या कॅम्पस इंटरव्यूच्या सफल आयोजनामध्ये या सेलचे प्रमुख प्रो. (डॉ.) एस.आर.पगारे, प्रो.(डॉ) व्ही.सी. ठाणगे, डॉ.जी.के. चव्हाण, डॉ. एन.टी. ढोकळे, डॉ. सुरेखा भिंगारदिवे इत्यादी प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.