सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या महाविजेती गौरीचा उत्कर्षा रुपवतेंनी केला गौरव 

 कोपरगाव प्रतिनिधी दि. २७ : घरी आठरा विश्व दारिद्र्य असुनही कोपरगाव तालुक्यातील गौरी अलका पगारे हिने आपल्या सुरांच्या जादूने संपूर्ण  महाराष्ट्राला वेड लावले आणि सारेगमप लिटिल चॅम्प्सची महाविजेती झाली याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवतेंनी गौरी पगारे हिच्या घरी जावून गौरव केला. 

 झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स या शोचा महाअंतिम सोहळा शनीवारी २५ नोव्हेंबर रोजी धुमधडाक्यात पार पडला. यावेळी गौरी अलका पगारे हिने तिच्या दमदार गायकीने परिक्षकांची मनं जिंकत विजेतेपदावर स्वतःचे नाव कोरले. गौरी पगारे हिने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पर्वात विविध प्रकारची गाणी गायली होती. कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगावात मामाच्या आश्रयात ती वास्तव्यास आहे. वडिलांनी बालपणीच आईसह दूर केलेल्या गौरीचा आईनेच सांभाळ केला. 

गौरी गाणं गाते म्हणून तिच्या गावातली व जवळच्या लोकांनी या मायलेकींना नावं ठेवत होती. येथे गाणं गावून तमाशात गायला जाणार काय? असे तिला वारंवार हिनवत होती. मात्र आपल्या लेकीवर आईचा विश्वास होता. तोच विश्वास गौरीला या शोमध्ये घेऊन आला. याच शोमध्ये गौरीने तिच्या वडिलांचे नाव हटवावे आणि आईचे नाव लावावे अशी अलका पगारे यांनी इच्छा व्यक्त केली होती. अभिनेत्री अमृता खानविलकर जेव्हा या शोमध्ये आली होती तेव्हा अमृताने गौरीच्या नावाची “गौरी अलका पगारे” अशी पाटी जाहीर करत आजपासून गौरी तिचे नाव बदलतीये अशी घोषणाच केली.

तेव्हा गौरीच्या आईला तिचे अश्रू थांबवता आले नाही, यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू दाटून आले होते. वैशाली माडेला तर गौरीच्या सुरेल गायकीने भुरळ पाडली होती. तिला गाण्याचे योग्य धडे देता यावे म्हणून गुरुकुल मध्ये वैशाली माडेंनी प्रयत्न केले. आज तिने घेतलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले असेच चित्र काल वैशाली समोर उभे राहिले होते. एकीकडे गौरी पगारे या शोची विजेती झाली.

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आनंद शिंदे, वैशाली माडे, सलील कुलकर्णी, आदर्श शिंदे आदींनी झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्सचे परीक्षक उत्तमच होते. त्यांनी योग्य ती पारख करून गौरी पगारेचा निवड केली. गौरीची निवड हि ग्रामीण भागातील सर्व सामान्य कलाकाराला दिलेली संधी आहे. गौरीच्या गाण्याचं आम्हाला कौतुक आहे. तीला भविष्यात कोणतीही मदत लागली तरी आपण ती देणार असल्याचे अभिवचन उत्कर्षा रुपवतेंनी देवून गौरी व तीची आई अलका पगारे यांचे अभिनंदन केले. 

 गौरी पगारेचा कौतुक करताना यावेळी कोपरगाव भारत गॅस एजन्सीचे प्रमुख रविंद्र वाघमारे, प्रशांत सालीअन, रणशिंगकार, प्रशांत अहिरे, राघव गायकवाड आदीं उपस्थित होते.