कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : पोहेगाव ता. कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली, असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये नागू विरकर (मसाई वाडी, सातारा), गणपत जाधव (यशवंत नगर जि. सोलापूर), आप्पासाहेब खोत (जाखले जि. कोल्हापूर), मनीषा पाटील (देशिंग हरोली, जि. सांगली), प्रवीण पवार (खंबाळ जि. धुळे), डॉ.रवींद्र कानडजे (बुलडाणा), डॉ. मारोती घुगे (अंबड जि. जालना) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. गणेश देशमुख व सहकार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे यांनी येथे दिली.
या प्रसंगी ट्रस्टी रमेश रोहमारे, शोभा रोहमारे, संदीप रोहमारे, अॅड. राहुल रोहमारे व प्राचार्य डॉ.बी.एस.यादव उपस्थित होते. भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे १९८९ पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी २०२२ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.1) हेडाम – नागू विरकर (ग्रामीण कादंबरी – समीक्षा पब्लिकेशन ,पंढरपूर) 2) हावळा – गणपत जाधव (ग्रामीण कथासंग्रह – शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा)
3) काळीज विकल्याची गोष्ट- आप्पासाहेब खोत (ग्रामीण कथासंग्रह, ललित पब्लिकेशन, शिवडी,मुंबई) 4) नाती वांझ होताना – मनीषा हरोलीकर (ग्रामीण कविता संग्रह, संस्कृती प्रकाशन, पुणे) 5) भुई आणि बाई – प्रविण वार (ग्रामीण कविता संग्रह, परिस पब्लिकेशन, सासवड, पुणे) 6) शेतकरी जीवनसंघर्ष : ऐतिहासिक परामर्श – डॉ. रवींद्र कानडजे (ग्रामीण समीक्षा, नाग-नालंदा प्रकाशन, विशाल नगर, इस्लामपूर) 7) १९८० पूर्वीची ग्रामीण कविता : प्रेरणा आणि प्रवृत्ती – डॉ. मारुती घुगे (ग्रामीण समीक्षा,यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे) प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख १५००० /- स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
या वर्षी कथासंग्रह, कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ट्रस्टकडे आलेल्या एकूण 67 साहित्य कृतीं पैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य डॉ. भीमराव वाकचौरे, डॉ. शिरीष लांडगे, लक्ष्मण महाडिक, डॉ. प्रमोद आंबेकर, डॉ. गणेश देशमुख, डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे यांच्यासंयुक्त निवड समितीने केले. वरील ग्रंथांशिवाय निवड समितीने आयास (शंकर विभूते), शाळा (ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर), अस्तित्व गमावलेली माणसं (महेंद्र गायकवाड), शिवार माती डॉटकॉम (प्रा. मुकुंद वलेकर), अंतस्थ हुंकार (शिवाजी शिंदे) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून निवड समितीने विशेष निर्देश केला आहे.
पुरस्कृत ग्रंथांबद्दल निवड समितीने म्हटले आहे की, पशु-जीवन, अभाव ग्रस्त देवदेवता, धार्मिकता, कष्टमय जगणे, नाच, अंगात येणे, माणूस, जनावरे यांचं आजारपण, उपचार, भटक्या जाती-जमातीच्या मुलांच्या शिक्षणाची होलपट असा धनगरी जीवनाचा परिप्रेक्ष्य असलेली हेडाम ही कादंबरी माणदेशी ग्रामीण जीवनाचे वास्तव आपल्यासमोर समर्थपणे मांडते. माणदेशाचा दुष्काळ, फिरस्त्या मेंढपाळ धनगरांचा संघर्ष, त्याचबरोबर सांस्कृतिक, धार्मिक तसेच भाषिक अशा अनेक बाजू या कादंबरीत मांडल्या आहेत. ‘हावळा’ या संग्रहातील कथा केवळ ग्रामीण जीवनाचे प्रत्ययकारी अनुभव विश्व व दुष्काळाची दाहकता नोंदवत नाहीत, तर अखिल मानवतेचा विचारही देतात.
तर ‘काळीज विकल्याची गोष्ट’या कथा ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करणाऱ्या कथा आहेत. त्यातून दुष्काळ, दूध उत्पादक आणि त्यांचे संघ, ऊस उत्पादक आणि साखर कारखाना, स्त्री-पुरुष, कुटुंब आदीतील विविध जीवनानुभवांचे प्रभावी चित्रण या कथांमधून पुढे येते. ‘नाती वांझ होताना’ कविता संग्रहातील कवितांमध्ये ग्रामीण स्त्रीचे विविध पातळ्यांवर होणारे शोषण, चित्रित झाले आहेच, पण समाजामध्ये झालेल्या नव्या बदलांनाही त्यातील स्री संयतपणे थेट भिडते. ‘भुई आणि बाई’ संग्रहाचे कवी प्रवीण पवार यांची कविता ही वेदनेतून आलेली आहे. आणि वेदनेतून आलेले साहित्य हे वेदने इतकच खोल असतो. म्हणून त्याचे ठसे उमटल्याशिवाय राहत नाहीत.
बाई वांझोटी व भुई पडीक असली तर तिचे अस्तित्व मूल्यहीन होते. हा विचार त्यांच्या कवितेने मांडलेला आहे. आजी पासून आजच्या तरुण मैत्रिणी पर्यंत अशा तीन पिढ्यांच्या वेदनेचा आलेख ‘भुई आणि बाई’ प्रवीण पवार यांनी रेखाटलेला आहे. ‘शेतकरी जीवन संघर्ष : ऐतिहासिक परामर्श’ हे रवींद्र कानडजे यांचे कृषि विषयक समस्यांवरील अभ्यास पूर्ण विवेचन आहे. या ग्रंथात त्यांनी आदीम काळापासून आज पर्यंत सुरू असलेल्या शेतीमातीशी निगडित माणसांच्या जीवनसंघर्षाची महत्त्व पूर्ण चर्चा केली आहे. डॉ मारुती घुगे यांनी १९८० पूर्वीची ग्रामीण कविता : प्रेरणा आणि प्रवृत्ती या ग्रंथातून ग्रामीण कवितेचा पुनर्शोध घेण्याचा केलेला, प्रयत्न निश्चितच वाखाणण्यासारखा आहे.
ग्रामीण कवितेच्या उगमाचा शोध घेताना त्यांनी लोक साहित्याशी असणारे तिचे अनुबंध स्पष्ट केले आहेत. त्यामुळेच या समीक्षा ग्रंथांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. कै. के. बी. रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणीवेतून १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो. ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीक्षम मनांना प्रोत्साहन देणे, हा या मागील मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी केले. सदर पुरस्कार वितरणाचे हे ३४ वे वर्ष असून पुरस्कार योजनेचे ३५ वे वर्ष आहे.
आज पर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील १७० पेक्षा जास्त लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण सुप्रसिद्ध लोक कवी मा. प्रशांत मोरे व सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या शुभहस्ते आणि कोपरगावचे माजी आमदार व कोपरगाव तालुका सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. के. बी. रोहमारे यांच्या २६ व्या स्मृतिदिनी दि.७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव येथे केले जाणार आहे. या पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास साहित्य रसिक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिवअॅड. संजीव कुलकर्णी व के. जे. सोमैया महाविद्यालय प्राचार्य डॉ. बी. एस.यादव यांनी केले आहे.