संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश, एमआयडीसी मंजूर – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व विकासासाठी कोपरगाव तालुक्यात एमआयडीसी सुरू करावी, यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण गेल्या पाच वर्षांपासून शासनदरबारी प्रयत्न करत होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, राज्य शासनाने सोनेवाडी येथे नवीन एमआयडीसी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. हा कोपरगाव तालुक्याच्या दृष्टीने मोठा आनंदाचा क्षण आहे. असे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर केल्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी (३० नोव्हेंबर) कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर फटाके वाजवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तत्पूर्वी, आयोजित पत्रकार परिषदेत विवेक कोल्हे यांनी एमआयडीसी मंजुरीसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानने केलेल्या प्रयत्नांची कागदपत्रांनिशी माहिती दिली.

राहाता तालुक्यातील शिर्डीनजीक सावळीविहीर व कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरातील सोनेवाडी येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) नवी वसाहत निर्माण करण्यास तसेच त्यासाठी शेती महामंडळाची ५०२ एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य शासनाने २९ नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. कोपरगाव तालुक्यासाठी सोनेवाडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर केल्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव तालुक्यातील युवक व जनतेच्या वतीने विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व राज्य शासनाचे आभार मानले.  

ते म्हणाले, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कोपरगाव तालुक्यात एमआयडीसी व्हावी म्हणून आम्ही संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आठ-दहा हजार युवकांच्या सह्यांचे निवेदन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जानेवारी २०१९ मद्ये निवेदन दिले होते. तसेच याबाबत तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना २० जून २०१९ व २० जुलै २०२१ रोजी निवेदन दिले होते.

तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन दिले होते. १७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रस्ताव कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला. संवत्सर, वारी, सोनेवाडी या ठिकाणी शेती महामंडळाची जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एक गुंठाही जमीन न घेता शेती महामंडळाची जमीन संपादित करून तेथे एमआयडीसी सुरू करावी, अशी आग्रही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली होती. याबाबत अभ्यासपूर्ण मांडणी करून आम्ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. 

शेती महामंडळाची जमीन महसूल खात्याची असल्याने एमआयडीसीसाठी आम्हाला ती जमीन महसूल खात्याकडून मिळणे गरजेचे आहे, असे देसाई यांनी सांगितल्यावर आम्ही तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून एमआयडीसीसाठी शेती महामंडळाची जमीन हस्तांतरित करावी म्हणून निवेदन दिले. तेव्हा चंद्रकांत यांनी महसूल विभागाला एमआयडीसीसाठी विनामोबदला जमीन देण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे सांगून तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुंगनटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली.

संवत्सर येथे वॉटरलेस इंडस्ट्रीसाठी पूरक वातावरण आहे. या ठिकाणी आय.टी. इंडस्ट्री सुरू झाली तर बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. शासनाने शिर्डी-कोपरगाव-येवला (एसकेवाय) कॉरिडॉर विकसित करावा, तसेच नव्याने होणारी एमआयडीसी ‘शिर्डी-कोपरगाव एमआयडीसी’ या नावाने संबोधण्यात यावे, अशी मागणी यावेळी विवेक कोल्हे यांनी यावेळी केली.

पाणीपुरवठा योजनेसाठी शेती महामंडळाची जमीन मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे, त्यानुसार एमआयडीसीसाठी शेती महामंडळाची जमीन विनामूल्य देण्याची आग्रही मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली होती. तसेच यासाठी लागणारी रक्कम देण्याची मागणी आम्ही २०१९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे केली होती.  

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले व कोपरगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी बदलले. त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला. २ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे पत्र प्राप्त झाले. उद्योग मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने मला फोन करून संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगाव तालुक्यासाठी एमआयडीसी बाबत जागा सुचवून प्रस्ताव दिला होता. त्याला आता चालना द्यायची आहे, असे सांगितले.   

त्यावेळी आपण नगरच्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यासमवेत विस्तृत चर्चा करून शेती महामंडळाच्या उपलब्ध जमिनीचे उतारे व आवश्यक माहिती सादर केली. चांदेकसारे, सावळीविहीर, संवत्सर आदी ठिकाणचे जमिनीचे उतारे व नकाशे सादर केले. तेव्हा मी नगरच्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सोनेवाडी येथे शेती महामंडळाची असलेली सुमारे २३६ एकर जमीन एमआयडीसीसाठी योग्य राहील, असे सुचवले होते.

राज्य शासनाने सावळीविहीर व सोनेवाडी येथे नवी एमआयडीसी निर्माण करण्यास तसेच त्यासाठी शेती महामंडळाची ५०२ एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एकूण ५०२.३४ एकर (२०३.४१ हेक्टर) क्षेत्र मंजूर असून, कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ब्लॉकचे ९४.१४ हेक्टर (जवळपास २३२ एकर) क्षेत्र एमआयडीसीसाठी प्रस्तावित आहे, असे विवेक कोल्हे यांनी सांगितले.