शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : शेवगाव शहराला १२ -१३ दिवसातून होणाऱ्या नळ पाणीपुरवठ्या ऐवजी किमान दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच शहरासाठी नव्याने मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला तातडीने सुरवात करण्यात यावी. या मागणीच्या पाठ पुराव्यासाठी शहरातील विविध प्रभागातील महिला कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी येथील पाण्याच्या टाकीवर चढून अक्षरशः शोले स्टाईल आंदोलन केले.
यावेळी नगरपरिषद मुख्याधिकार्यावर संतप्त महिलांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला. तसेच काही महिलांनी नळाला येणारे गाळ मिश्रीत पाणी मुख्याधिकार्या वर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र संयोजक महिलांनी त्यांना आवरले.
जायकवाडी जलाशयाच्या जॅकवेल वरून शेवगाव व पाथर्डी शहरासह दोन्ही तालुक्यातील ५४ गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र शेवगाव शहरात कधी १२ तर कधी १५ दिवसांनी पाणी पुरवठा होतो. मात्र नगरपरिषद वर्षाची पाणीपट्टी सव्याज वसूल करत असल्याने शेवगावकरावर हा जाणीवपूर्वक अन्याय कशासाठी ? असा निरुतर करणारा सवाल आंदोलक महिलांनी केला.
शहरातील पाण्याची जूनी पाईप लाईन जीर्ण झाली असल्याने सतत दूषीत पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पिण्याचे पाणी कित्येक दिवस साठवून ठेवावे लागते. अनेकदा पाण्यात आळ्याचा प्रादुर्भाव होऊन साथीचे आजार उद्भवले आहेत. यावेळी उपस्थित महिलानी केलेल्या जोरदार घोषणा बाजीने परिसर दणाणून गेला.
मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी लेखी दिल्या नंतर महिलांनी हे आंदोलन तात्पुरते आटोपत घेतले. राऊत यांनी दिलेल्या लेखीत म्हटले आहे की, शहरासाठी प्रतिदिनी ७० ते ७५ लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सध्या पाण्याची आवक कमी होत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होतअसल्याने पाणीपुरवठा विलंबाने होत आहे. पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा झाला की पाणी पुरवठ्यात सातत्य राखले जाईल.
या वेळी स्नेहल फुदे, सिमा बोरुडे, वीना नांगरे, सुनिता काथवटे, गिता बाहेती, शोभा शिनगारे, भारती बाहेती, सुनिता गवळी, उषा काथवटे, बालीका फुंदे, शुभांगी मुळे, बबीता मगर, प्रतिभा नाईक शारदा सोनवणे, वैशाली बडधे, कल्पना घोलप, हिराबाई शिंदे, सुरेखा जाधव, शिवकन्या बोरुडे, मनिषा खेडकर, प्रतिभा राऊत, मीना काथवटे , यमुना शिंदे, सविता घनवट आदिसह महिलांची उपस्थिती होती.
महिला पोलिस नाईक संगिता पालवे, शितल गुंजाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला.