शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : शेवगावातील क्रांती चौकात गेल्या ३० ते ४० वर्षापासुन फळे, वडापाव, भजेपाव, भेळ, अंडापाव, आईस्क्रिम तसेच, सोडा विक्रेते हातगाडया लावून व्यवसाय करत आहेत. त्यांना गेल्या आठवड्यात मंगळवार दि.५ पासून हातगाड्या लावण्यास पोलिसानी मज्जाव केला असल्याने या व्यावसायिकांनी क्रांती चौकात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हातगाडी धारकांना सहा महिन्यापुर्वी शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी हातगाडी धारकांची बैठक घेऊन काही सुचना करून नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हातगाडी धारकांनी आपल्या हातगाडीवर नोपार्कींग बोर्ड लावले. त्याचबरोबर आपला व्यवसाय करण्यासाठी सा.बा.उपविभागाकडुन रस्त्यावर पांढरे पटटे मारून घेतले. व आपापले व्यवसाय सुरळीत सुरू केले.
तथापि गेल्या आठवड्यात मंगळवारी (दि.५) पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी या हातगाडी धारकांना या ठिकाणी तुमचे अतिक्रमण असल्याचे सांगून हातगाडया लावण्यास प्रतिबंध केला. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगितले आहे. रोजीरोटीचा व्यवसायच बंद झाल्याने हातगाडी धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना वरिष्ठांनीच अगोदर दिलेल्या सवलती व नियमानुसार व्यावसाय करू देण्याच्या मागणीसाठी बुधवार दि.१३ पासून या व्यावसायिकानी बेमुदत उपोषणास सुरु केले आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात, न्याय न मिळाल्यास अन्नपाणी त्याग आंदोलनाच ईशारा देण्यात आला असून कॉ.संजय नांगरे, राहूल सावंत, सतिष बोरूडे, संजय लहासे, तान्हाजी मोहिते, चंद्रकांत कर्डक, सुभाष लांडे, बाळासाहेब लष्करे, संदिप काथवटे, गणपत भाडाईत, सय्यद मोसिन, इरफान पठाण, पप्पुभाई तांबोली, राजु मोहिते, बबलु गुप्ता, सचिन शिनगारे, रावसाहेब गुंजाळ, आदिल आतार, मुन्ना भोकरे, किरण गायकवाड, सतिष गायकवाड, शेख जावेद असिफ, जावेद बागवान, जुबेर शेख, इरफान पठाण, अश्पाक बागवान आदींच्या निवेदनावर सहया आहेत.