शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : येथील एका गल्लीत गोमांस विक्रीसाठी आल्याच्या संशयावरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात, वादविवाद होऊन मंगळवारी रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात फिर्याद दाखल करण्याबाबत रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरु होता. सर्व गोधळानंतर रात्री उशिरा गोपनिय शाखेचे सहाय्यक संतोष वाघ यांनी सरकार तर्फे शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले की, मंगळवारी दुपारी सहकारी शाम गुंजाळ आम्ही शहरात पेट्रोलिंग करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो. तेंव्हा खाटीक गल्लीत अचानक धावपळ व आरडा ओरडा चालु होता. म्हणुन तेथे गेलो असता काही घरांमध्ये गोमांस आले असल्याचे संशयावरुन दोन गटात वादविवाद करुन धक्काबुक्की करताना दिसुन आले. यावेळी परिस्थिती लक्षात घेत तात्काळ पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना कळवले.
या वादाची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील व अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांनी शेवगावात येऊन घडल्या प्रकाराची माहिती घेऊन सुचना केल्या. दोन्ही गटाचे समुपदेशन केल्याने सध्या वातावरण शांत झाले. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी पाचला शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर मदतीसाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीही लगेच आले. त्यावेळी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, स. पो. नि. दीपक सरोदे, आशिष शेळके, पो.उ.नि.नीरज बोकील व इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करुन जमाव पांगवला. या ठिकाणी आपापसात गैरकायद्याची मंडळी जमवुन वाद विवाद करणारे ईसमाची नावे याबाबत चौकशी केली असता, शिवम देविदास घोडेचोर (देवसडे ता.नेवासा), तुषार भातंबरे (रा, चिलेखनवाडी ता. नेवासा), बंटी म्हस्के, सचिन पन्हाळे (दोघे रा. शेवगाव) व त्यांचे तीन ते चार अनोळखी साथीदार त्यांचे नाव पत्ता समजला नाही.यांनी तेथे गोमांस आणले आहे, याचा शोध घेण्यासाठी आले होते.
सदर ठिकाणी चार-पाच अन्य समजाचे अनोळखी इसम होते. ते आपसात वाद विवाद करत होते. यातील एका गटाचे इसम म्हणत होते की, आमचे गल्लीत तुम्ही विनाकारण का आले, या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून आपसात वादविवाद करुन धक्काबुक्की करतांना मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग आदि कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना समजपत्र देऊन सोडण्यात आले.