महसूल सप्ताहाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचा शुभारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०७ : शेवगाव तहसिल कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या, रक्तदान शिबीराने येथे धूमधडाक्यात सुरु झालेल्या महसूल  सप्ताहाची सांगता झाली. या रक्तदान शिबीराचे वैशिष्ट्य असे की, येथे नुकतेच रुजू झालेल्या तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी प्रथम स्वतः रक्तदान करून शिबीराचा शुभारंभ केला, शिवाय त्यांच्या पत्नी प्रिती सांगडे यांनी देखील रक्तदान करून, शिबीरात सहभाग नोदविला.

गटविकास अधिकारी राजेश कदम, परिक्षाविधीन तहसिलदार राहूल गुरव, परिक्षाविधीन नायब तहसिलदार राजेंद्र सानप, यांचेसह तहसिल कार्यालयातील २५ अधिकार्‍यानी रक्तदान केले. नगरच्या जनकल्याण रक्त पेढीचे डॉ. विलास मढीकर यांचे पथकाने रक्तदान स्विकारले.

मंगळवारी (दि १) महसूल सप्ताहाचा शुभारंभ परिक्षाविधीन आय.पी.एस अधिकारी बी. चंद्रकात रेड्डी यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचे क्यअर कोडचे अनावरण करून तहसिल कार्यालयातील ४५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी गेली वर्षभर उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या कर्मचार्‍याना रेड्डी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रांतधिकारी प्रसाद मते यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शैक्षणिक संस्था मध्ये पार पडलेल्या, युवा संवाद उपक्रमात १७५ नवमतदार युवकांची नोदणी करण्यात आली. तालुक्यातील बोधेगाव येथे एक हात मदतीचा उपक्रमात परिसरातील गरजूंना सामाजिक सहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला. पीएम किसान योजने सह विविध दाखल्याचे वितरण करण्यात आले. जनसंवाद उपक्रमा अंतर्गत २५ वर्षा पासून प्रलंबित असलेला  शहाजापूर – अमरापूर शिवरस्ता प्रांतधिकारी मते यांच्या प्रमुख उपस्थितीत खुला करण्यात आला. फेरफार अदालतीत १२० फेरफार उतारे निर्गत करण्यात आले.

सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमासाठी ६० माजी सैनिकांनी उपस्थिती लावली. त्यात काही माजी सैनिकांच्या विधवा पत्नीचा समावेश होता. त्यांच्या विविध तक्रारीचे निराकरण करण्यात आले. यावेळी तालुक्यातील दोन माजी सैनिकांच्या कुटूबीयाना रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. श्रीकांत गोरे, शशिकांत देऊळगावकर, गणेश हुलमुखे यांनी महसूल सप्ताहाच्या निमित्ताने पार पडलेल्या विविध उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.