स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदोत्सवाची जय्यत तयारी सुरू
कोपरगाव प्रतिनिधी, दि, १४ : अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उदघाटन व श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर आता सर्वांसाठी खुले होणार आहे. संपूर्ण देशभरातील रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण असणार आहे. त्याअनुषंगाने कोपरगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीराम मंदिर उदघाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
यासंदर्भात माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अयोध्येत होणारा श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कोपरगाव शहरात २२ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयाने सन २०१९ मध्ये अयोध्येतील श्री रामजन्मभूमी वादावर दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करून श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी आराखडा तयार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाला गती दिल्याने आता राम मंदिराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. श्रीराम जन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराचे उदघाटन व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक साधू-संतांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नरेंद्र मोदी सरकारने अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे आश्वासन दिले होते. अखेर मोदी सरकारने त्या आश्वासनाची पूर्तता केली असून, चारशे वर्षांपासूनचे श्रीराम मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे देशभरातील रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणारा श्रीराम मंदिर उदघाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशाचा सर्वात मोठा उत्सव असणार आहे. त्यामुळे कोपरगाव येथे भव्य-दिव्य स्वरुपात आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
यानिमित्ताने शहरातील श्रीराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात येणार आहे. २२ जानेवारीला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. कोपरगाव शहर व तालुक्यातील रामभक्त नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.