कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असतांना व कोपरगाव नगरपरिषदेमध्ये देखील बहुमताने सत्ता असतांना कोपरगाव शहरात विकास कामे होऊ शकली नाहीत. या उलट आ.आशुतोष काळे यांनी २०१९ पासून ५ नंबर साठवण तलावासह कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत हे कोपरगावकर जाणून आहेत. ज्यांना त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी एक रुपयाचा निधी आणता आला नाही. त्यांना व त्यांच्या बोलघेवड्यांना पाणी प्रश्नावर बोलण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे ज्यांचे कोपरगावच्या विकासात कोणतेही योगदान नाही. अशा बोलघेवड्यांनी शहरवासियांमध्ये संभ्रम पसरवू नये. असा खोचक सल्ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे यांना दिला आहे.
कृष्णा आढाव यांनी म्हटले आहे की, कोपरगावकरांना गढूळ पाणी मिळाले याचे समर्थन कुणीच करू शकत नाही आणि करणारही नाही. आजपर्यंत प्रशासनाकडून ज्या चुका झाल्या त्याचा जाब विचारणे हा आमचा हक्क असून हा हक्क आम्ही सत्तेत असो अथवा नसो तरीदेखील कायमच बजावला आहे आणि यापुढील काळात देखील बजावणार आहे. त्यामुळे आम्ही आज नगरपरिषदेमध्ये जाऊन जाब विचारला, मात्र त्याचे काही बोलघेवड्यांना वाईट वाटत असले तरी त्याची पोटदुखी मात्र वेगळीच आहे. २०१४ ते २०१९ मध्ये त्यांच्या पक्षाचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार असतांना माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी इकडून पाणी आणते, तिकडून पाणी आणते असे गाजर दाखवून कोपरगावकरांना झुलवत ठेवले.
त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत कोपरगावकरांनी काळाची पावले ओळखून त्यांना घरी ठेवण्याचा आहेर दिला. तो पराभव आजपर्यंत त्यांना पचवता आलेला नाही. त्यामुळे कोपरगावतील रस्त्यांच्या कामासंदर्भात उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आणली, कोपरगावकरांना पाणी मिळू नये. याकरीता न्यायालयात याचिका दाखल केली यावरून त्यांचा कोपरगावकरांविषयी असलेला खोटा कळवळा दिसून येतो. कोपरगावकरांना गढूळ पाणी मिळाले याबाबत आ.आशुतोष काळे यांनी प्रशासनाला अशा चुका होणार नाहीत, याबाबत कडक शब्दात समज दिली आहे.
४२ कोटीच्या पाणी योजनेत भ्रष्टाचाराला खतपाणी कोणी घातले? व गढूळ पाण्याचे पाप कोणाचे आहे? हे देखील कोपरगावकरांना चांगलेच माहित आहे. सत्ता असतांना तुम्हाला त्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी करता आला नाही. ४ नंबर साठवण तलावाच्या दुरुस्तीसाठी माजी आ. अशोक काळे यांनी आणलेला २ कोटी निधी तुम्ही सत्ताधारी आमदार असल्यामुळे तुम्हाला श्रेय मिळणार नाही. या भीतीपोटी कुटील राजकारण करून ४ नंबर साठवण तलावाच्या दुरुस्तीचे काम होवू दिले नाही हे देखील कोपरगावकरांना माहित आहे.
माजी आमदार अशोक काळे यांनी आणलेली ४२ कोटीची पाणी योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात कोणी व कशी गुरफटवली? त्या ४२ कोटीच्या पाणी योजनेच्या वितरण व्यवस्थेसाठी टाकलेल्या अदृश्य पाईपलाईन? या योजनेच्या ठेकेदाराचा पिच्छा करून ठेकेदाराकडून पैसे घेण्यासाठी बँकेत जाणारे आपले नगरसेवक कोपरगावकरांनी त्यांच्या डोळ्यांनी पहिले आहे.
तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करून विकासाला विरोध तर करतातच परंतु आपले दैवत असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकाबाबत देखील राजकारण करतात याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे. यासाठी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पुढाकार घेवून त्यांचे स्मारक उभे केले. परंतु राजकीय आकसापोटी त्यांचे अनावरण देखील होऊ न देणाऱ्या बोलघेवड्यांनी कोपरगावच्या विकासाबाबत न बोललेच बरे. त्यामुळे कोपरगावच्या विकासाला विरोध करणाऱ्या व विकासात योगदान नसणाऱ्या बोलघेवड्यांनी कोपरगावकरांमध्ये संभ्रम पसरवू नये. असा खोचक सल्ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे यांना दिला आहे.