पुर्व भागातील बंधारे पालखेडच्या पाण्यांने भरून द्यावे – स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ :  दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे तालुक्याच्या पुर्व भागातील बंधारे व पाझर तलाव पालखेडच्या पाण्याने भरून द्यावे. अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता पालखेड पाटबंधारे विभाग नासिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.        त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, चालु पावसाळी हंगामात खरीप व रब्बी हंगामात पाउस झाला नाही. त्यामुळे पुर्व भागातील कोळ नदीवरील सर्व बंधारे कोरडेठाक आहेत. नागरिकांना व जनावरांना पिण्यांच्या पाण्याची मोठया प्रमाणांत अडचण तयार झालेली आहे.

सावळगाव, शिरसगाव, तिळवणी, आपेगाव, उक्कडगाव, आदि भागातील रहिवासीयांनी पालखेड डाव्या कालव्यातुन हे सर्व बंधारे व पाझर तलाव भरून द्यावेत म्हणून सातत्यांने मागणी केलेली आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर पाण्यांच्या अडचणीची मांडणी करून पालखेड डाव्या कालव्यातुन हे सर्व बंधारे भरून दिल्यास त्याचा या भागातील रहिवासीयांना पिण्यांच्या पाण्यासाठी दिलासा मिळेल अन्यथा टँकरमार्फत पाणी पुरवठा करावा लागेल. त्यासाठी मोठा खर्च येईल तेंव्हा पालखेड डाव्या कालव्यातुन हे सर्व बंधारे व पाझर तलाव भरून द्यावे असेही स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.