शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : अल्प कालावधीत वीना परिश्रमात मिळणाऱ्या मोठ्या फायद्याच्या लालसेपोटी ग्रामीण भागात कार्यरत झालेल्या खाजगी कंपन्याकडे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी देखील गुंतवणुकीसाठी आकर्षित झाले आहेत. काबाड कष्ट करून प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन पै-पै करून साठवून ठेवलेली रक्कम लोक या कंपन्यात गुंतवित आहेत. एकप्रकारे ते आपले नशीबच पणाला लावत आहेत. काही जण तर ठेव पावत्या मोडून, शेतमालाची मिळेल त्या भावात विक्री करुन या कंपन्यांच्या नादी लागत आहेत. याचा बँका, निधी संस्था, पतसंस्थांच्या ठेवींवर परिणाम झाला आहे.
सांगावांगी तसेच नियोजन पूर्वक होत असलेल्या प्रचाराच्या माध्यमातून हा गोरख धंदा या भागात चांगलाच फोफावला आहे. मात्र, भरमसाठ परतवा देणाऱ्या सदर कंपन्याच्या विश्वासाहर्तते बाबत येथे कोणी ठाम पणे सांगू शकत नसल्याचे काहीचे म्हणणे आहे. तर बँका, पतसंस्था पेक्षा कित्येक पटीने जास्त परतावा मिळत असल्याने अनेक जण या कंपन्याच्या मोहात पडत आहेत. या कंपन्यानी प्रारंभी गुंतवणुक करणाऱ्याना परतवा देवून त्यांचा विश्वास संपादन केला असून तेच त्यांचे भांडवल झाले. अशी येथे चर्चा असून जर य़ा कंपन्या तोट्यात गेल्यास अथवा बंद पडल्यास गुतवणुकदाराच्या पैशाचे काय अशी शंका काही गुंतवणूकदार विचारत आहेत.
शेवगाव सारख्या ग्रामीण भागात आलिशान कार्पोरेट टाईप कार्यालये, महागड्या कंपन्याच्या चारचाकी वाहनांचा लवाजमा पाहून पंचक्रोशीतील अनेक जण आकर्षित होत आहेत. या शेयर मार्केटशी संबंधित कंपन्यांमध्ये हजारो नागरिकांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केल्याची चर्चा असून त्याचा परिणाम जमीन, प्लॉट खरेदी विक्रीवर देखील झाल्याचे बोलले जाते. ग्रामीण भागात कार्यरत झालेल्या या खासगी कंपन्या महिन्याला शेकडा आठ ते दहा टक्के परतावा देत आहेत. म्हणजे लाख रुपये गुंतवून महिन्याला आठ ते दहा हजार रुपये परतावा मिळत असल्याने आकर्षित होऊन, गुंतवणूकदार जवळची साठवलेली पूंजी, विविध बँका पतसंस्थांमध्ये असलेल्या ठेव पावत्या मोडून तसेच उसाचे पेमेंट, कपाशी, धान्य, कडधान्य विक्रीतून मिळालेले पैसे, त्या खाजगी कंपन्यामध्ये गुंतवणूक करीत आहेत.
महिन्याला ठरलेल्या तारखेला व्याज जमा होत असल्याचे यातील काही गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे या शेअर मार्केट कंपन्यांच्या तुलनेत, सरकारी बँकामध्ये मुदत ठेवीवर सरासरी ७ ते ८ टक्के तर पतसंस्थामध्ये ८ ते १० टक्के व्याज दराने व्याज दिले जाते. साधारणतः १२ ते १३ महिन्यांच्या मुदत ठेवीवर एक लाख रुपयांसाठी सातशे ते आठशे रुपये महिन्याला व्याज मिळते. त्या तुलनेत खाजगी कंपन्या अधिक पटीने मोठ्या प्रमाणात व्याज देत असल्याने, झटपट पैसा कमावण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
या कंपन्यांकडे जमा होणारे भांडवलाची पुढे कुठे? कशी गुंतवणूक करतात? त्यातून परतावा देणे त्यांना कसे जमते? या कंपन्याच्या रजिस्ट्रेशन, नोंदणी बाबत तसेच त्यांना अशा प्रकारच्या ठेवी अधिकृतपणे स्विकारता येतात का? हे देखील अनेकांना खात्रीशीर माहिती नाही. शेअर मार्केटशी निगडित कंपन्या आहेत इतकीच जुजबी माहिती अनेकांना आहे.