स्वयंपाकी व मदतनीस संघटनेची हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : भारत देशामध्ये सर्वात कमी मानधनावर काम करणारा वर्ग म्हणजे प्रधानमंत्री पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी व मदतनीस कर्मचारी हा वर्ग आहे. या वर्गाला आज रोजी 83 रुपये रोज मानधन मिळत असून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न, त्यांचे भवितव्य या कर्मचाऱ्यावर अवलंबून आहे. परंतु इतका महत्त्वाचा हा घटक असून देखील त्यांच्या समस्या आजपर्यंत प्रलंबित आहे. म्हणून सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकी व मदतनीस या संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्या संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा व्हावी.

यासाठीचे निवेदन काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांच्याकडे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते व राज्य समन्वयक शरद लोहकरे, नागपूर महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष नॅस नुसरतली यांनी समक्ष नागपूर या ठिकाणी त्यांना भेटून दिले आहे. सदर प्रश्न हा अतिशय गंभीर असून या कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले याप्रसंगी संघटनेचे इतर पदाधिकारी ही उपस्थित होते.