ताजनापूर उपसा जल सिंचनचे पाणी वितरण कुंडात पोहोचले

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६: अखेर ताजनापूर उपसा जल सिंचन योजना टप्पा क्रमांक दोनचे पाणी वितरण कुंडात पोहोचले, शेवगाव तालुक्यातील वीस गावासाठी संजीवनी ठरणारी ताजनापूर टप्पा दोन ही योजना अंतिम टप्प्यात असून योजनेच्या पाच पैकी दोन वितरण कुंडात पाणी पोहोचून त्याची यशस्वी चाचणी शुक्रवारी (दि.१५) घेण्यात आली. उर्वरित वितरण कुंडांतून पाण्याची चाचणी घेण्यासाठी ताजनापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उप कार्यकारी अभियंता श्रीहरी कुलकर्णी व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

२०१४ सालापासून या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना तानापुर उपसा सिंचन योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध केला, आतापर्यंत या योजनेसाठी सुमारे १२० कोटी खर्च करण्यात आला. योजनेच्या मुख्य पंपग्रह पोहच कालवा उर्दूगामी नलिका, वितरण कुंड यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती देऊन योजनेच्या वितरण कुंड पुढील पाईप वितरण व्यवस्थेचे काम जून २०२४ अखेर पूर्ण करण्याची ग्वाही आ.मोनिका राजळे यांनी दिली आहे.

जायकवाडी जलाशयातून ताजनापूर उपसा सिंचन योजनेसाठी ३८७८ द.ल.घ.फु. पाणी आरक्षित करण्यात आले. पैकी १६११ द.ल.घ. फु. पाणी टप्पा क्रमांक एक साठी तर उर्वरित २२६७ द.ल.घ. फु. पाणी टप्पा दोन साठी उपलब्ध आहे. यामध्ये वीस गावातील ६९६० हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचा लाभ होणार आहे. योजनेच्या एमआर २, एमआर ३ च्या पंपाची यशस्वी चाचणी झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, लवकरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहितीही आ.राजळे यांनी दिली.