शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : समाजातल्या गरजू घटकांना आपलेसे करणे, त्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी दानधर्म करणे ही आपली संस्कृती आहे. प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा मदतीसाठी पुढे केलेला एक हात महत्त्वाचा असतो.
शिंदे परिवाराने मातृ-पितृ स्मरण अर्थ आत्तापर्यंत दिलेल्या बहुमोल सामाजिक योगदानाचा आदर्श घेण्यासारखा आहे असे प्रतिपादन निलेश महाराज वाणी यांनी केले.
तालुक्यातील वरूर येथील दादासाहेब शिंदे यांनी आपल्या मातोश्री कै. गयाबाई विठ्ठलराव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आमदार निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला बाई लंके व वाणी महाराज यांचे हस्ते शेवगाव येथील उचल फाऊंडेशन संचलित निराश्रीत मुला – मुलींच्या वसतीगृहास ५१ हजार रूपयाचा धनादेश देण्यात आला यावेळी ते बोलत होते.
या वस्तीगृहात ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती बिकट असणारी व आई-वडिलांचे छत्र हरवलेली अनेक गरजू मुले- मुली शिक्षण घेत आहेत. केवळ सेवाभावी तत्त्वावर चालणाऱ्या या वस्तीगृहाला सामाजिक संस्था व अनेक मंडळींकडून मदत केली जाते. शिंदे कुटूंबाने दिलेला धनादेश वसतीगृह संचालिका सुजाता खेडकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी अनेक सांप्रदायिक मंडळी व ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.