शांती, संयम, व परोपकार या शिवणूकीची आजच्या काळात मोठी गरज – प्रताप ढाकणे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ :  प्रभू येसू ख्रिस्तांनी शांती, संयम, सेवा व परोपकारी वृत्तींचा विचार मानवतेसाठी दिला. त्यांच्या याच शिवणूकीची आजच्या काळात मोठी गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केले.

नविन वर्षानिमित्त सकाळी शेवगांव येथील चर्चमध्ये आयोजित नुतन वर्षाभिनंदन ख्रिस्ती बांधवाच्या कार्यक्रमात व शौर्य दिना निमित्त शेवगांवतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून अभिवादन केले. यावेळी फादर सुभाष त्रिभूवन, सिस्टर ज्युली, केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे, भारदे शिक्षण संस्थेचे सचिव हरीष भारदे, माजी सरपंच सतिष लांडे, राहुल मगरे, वजीर पठाण, संजय बडधे, राजू जहागीरदार, सरपंच शरद सोनवणे, प्रकाश दहिफळे, अशोक शिंदे, कैलास तुजारे, बापूसाहेब गवळी, अनिल इंगळे,सतिष मगर, पास्ट संदिप मगर उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले, भारतीय राज्यघटनेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार दिलेले आहे. मात्र, हे अधिकार प्रदान करण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. भारताचे राजकीय संविधान जगातील सर्वोच्च संविधान असून आज या संविधानाला धक्का पोहचतो की काय? अशी परिस्थिती  निर्माण झाली आहे.

घटनेतल्या अनेक कलमांविषयी एका विशिष्ट घटकांकडून अपप्रचार निर्माण करुन देशातील सामाजीक परिस्थिती जाणीव पुर्वक अस्थिर करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. दुर्देवाने जातीधर्माचा वापर राजकारणासाठी वाढत चालल्याने समाजात दुरी व सामाजिक द्वेष निर्माण होत आहे. जो भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक  ठरु शकतो.