इंडियन डाॅक्टर्स ऑलिंपिकमध्ये डॉ. जितेंद्र रणदिवेंना सुवर्णपदक

कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : आपल्या वैद्यकीय सेवे बरोबर खेळाची आवड जपणारे डॉ. जितेंद्र रणदिवे यांनी इंडियन डाॅक्टर्स ऑलिंपिक स्पर्धेतील कॅरम (डबल) खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावून कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 इंडियन डाॅक्टर्स ऑलिंपिक अंतर्गत सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे करण्यात आले होते. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. 

 देशभरातील दिड हजार पेक्षा अधिक डाॅक्टर्स खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. क्रिकेट, बुध्दीबळ, कॅरम, हाॅलीबाॅल, टेबल टेनिस, अथलेटिक्ससह विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या.  कोपरगावचे सुपुत्र डॉ. जितेंद्र रणदिवे यांनी कॅरम स्पर्धेत देशभरातील दिडशे खेळाडूंना मागे सारत नाशिकचे डॉ. रूपेश मर्दा यांच्या मदतीने प्रतिस्पर्धींचा पराभव करुन सुवर्णपदक पटकावले.

डॉ. जितेंद्र रणदिवे यांनी सुवर्णपदक पटकावून कोपरगावचे नाव देशाच्या पटलावर चमकावले आहे. डॉ. रणदिवे यांच्या सुवर्ण कामगिरीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेञात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच डॉ. रणदिवे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.