समाजात पत्रकारांची अत्यंत मोलाची भूमिका – प्रा. डॉ. दुकळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०८ :  ग्रामीण परिसरातील पत्रकारांनी त्या त्या परिसरातील लोक विकासाच्या प्रलंबित प्रश्नांबरोबरच शिक्षण शेती आरोग्य आदी विषयावर प्रकाशझोत टाकून त्या त्या परिसरातील अडचणी सोडविण्यासाठी योगदान द्यायला हवे. तसेच परिसराचा अधिकाधिक विकास होईल या दृष्टीने आपल्या लेखणीतून सर्वसमावेशक लिखाण करण्याची आवश्यकता येथील निर्मला काकडे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग दुकळे यांनी व्यक्त केली.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनानिमित्त शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा सोमवारी विद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य डॉ. दुकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. जांभेकर व निर्मला काकडे यांच्या प्रतिमेला अभिवादन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पत्रकारांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगून त्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, समाजात पत्रकारांची अत्यंत मोलाची भूमिका राहिली आहे. शालेय जीवनात विविध माध्यमातून यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा समाजात लौकिक व्हावा. त्यांना अधिक संधी उपलब्ध व्हावी. यासाठी परिसरातील पत्रकारांच्या सहकार्याचा लाभ होत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

प्रा. भाऊसाहेब खाटीक, संतोष निजवे, रोहिणी खंडागळे, अमोल आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील वृत्तपत्र प्रतिनिधी  उपस्थित होते. दिपाली गरड व शितल गुंजाळ यांनी सूत्रसंचलन केले. तर प्रा. उगलमुगले यांनी आभार मानले.