गोदाकाठ महोत्सवात झाली दीड कोटीची उलाढाल- सौ.पुष्पाताई काळे

गोदाकाठ महोत्सवाची उत्साहात सांगता

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ :  महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित सलग चार दिवस सुरु असलेल्या गोदाकाठ महोत्सवाची सोमवार (दि.०८) रोजी मोठ्या उत्साहात सांगता झाली असून या चार दिवसात जवळपास दीड कोटीची उलाढाल झाली असल्याची माहिती गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मागील एक दशकापासून सुरु करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवात चालू वर्षी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला कोपरगावसह शेजारच्या येवला, वैजापूर,राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, सिन्नर, आदी तालुक्यातील नागरिकांनी देखील खरेदीसाठी अमाप गर्दी गेल्यामुळे मोठी उलाढाल झाली आहे. त्यामुळे बचत गटाच्या महिलांना मोठी आर्थिक मदत झाली आहे. कृषी साहित्य, तयार पापड, लोणचे, सौंदर्य प्रसाधने, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी, सर्व प्रकारची मसाले, सुगंधी अगरबत्ती, गृह सजावट साहित्य अशा अनेक प्रकारच्या खरेदीसाठी व विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाची चव चाखण्यासाठी सलग चौथ्या दिवशी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. 

गोदाकाठ महोत्सवात प्रत्येक महिला बचत गटाच्या सरस उत्पादनांना मोठी मागणी व नागरिकांचा मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे बचत गटाच्या महिलांचा उत्साह निश्चितच दुणावला आहे. त्यामुळे ‘गोदाकाठ महोत्सव’ आयोजित करण्याचा उद्देश सफल झाला आहे. बचतगटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, उत्पादने सर्वांनाच भावली. अस्सल गावरान चव आणि उच्च प्रतीचा स्वाद असलेल्या खानपानाच्या प्रत्येक स्टॉलवर पाय ठेवायला देखील जागा नव्हती एवढी प्रचंड गर्दी होती. खवय्यांनी सर्व पदार्थांचा मनापासून आस्वाद घेवून ग्रामीण भागातील अन्नपूर्णांच्या पाककौशल्याला भरभरून दिलेली दाद त्यामुळे यावर्षी सर्व बचत गटांच्या उत्पादनांची विक्री दीड कोटीवर पोहोचली आहे. जाहिरातीच्या युगात ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी आपली गुणवत्तापूर्ण उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवून व्यवसायात चांगलाच जम बसविला असल्याचे सिध्द झाले असून हा अनुभव महिलांना पाठबळ, नवा आत्मविश्वास व उर्जा देणारा ठरणार आहे.- आ.आशुतोष काळे

एकीकडे महिला बचत गटांना आर्थिक उभारी द्यायची. त्याचबरोबर हजारो उगवत्या कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देवून कोपरगावचे भूषण असलेल्या भविष्यातील गौरी पगारे सारखे गुणवंत कलाकार घडविण्याकडे गोदाकाठ महोत्सवाची वाटचाल सुरु आहे हेच गोदाकाठ महोत्सवाने आपले वेगळेपण जपले आहे.

   दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती वाढत चालली असल्याचे यावर्षी देखील दिसून आले. यावर्षी तब्बल ३०० बचत गटाच्या महिलांनी आपले विविध घरगुती उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉल्स लावले होते व पुढील वर्षी होणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाचे जवळपास ५० टक्के बुकिंग देखील सांगता समारंभ प्रसंगी बचत गटाच्या महिलांनी केले आहे. यावरून पुढील वर्षी होणाऱ्या गोदाकाठ महोत्सवात यावर्षीपेक्षा जास्त मोठी उलाढाल होणार असल्याचा अंदाज बचत गटाच्या महिलांनी वर्तविला आहे.

गोदाकाठ महोत्सवात शेवटच्या दिवशी दिवसभर नागरिकांची तुफान गर्दी होती. सोमवारी बाजारचा दिवस असल्यामुळे दिवसभर व सायंकाळी देखील गर्दीच गर्दी झाली होती. विविध वस्तूंच्या खरेदीसह शेकडो प्रकारच्या पदार्थांवर कोपरगावकरांनी चांगलाच ताव मारला. त्यामुळे गोदाकाठ महोत्सवात मोठ्या प्रमाणात उलाढाल होवून  झालेल्या मोठ्या कमाईचे समाधान स्पष्टपणे बचत गटांच्या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हाच खरा गोदाकाठ महोत्सवाचा उद्देश आणि हेच बचत गटाच्या महिलांचे खरे आर्थिक सक्षमीकरण त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आर्थिक प्राप्तीचा आनंद निश्चितपणे सुखावणारा आहे. – सौ. चैतालीताई काळे

गोदाकाठ महोत्सवाच्या सांगता समारंभ कार्यक्रमात कोपरगाव मतदारसंघातील आशा सेविका व विविध क्षेत्रात पुरस्कार मिळालेल्या कोपरगावच्या सुपुत्रांचा गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, आ. आशुतोष काळे, महानंदाचे चेअरमन राजेश परजणे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच आ. आशुतोष काळे व सौ.चैतालीताई काळे यांनी बचत गटाच्या महिलांचा गौरव करून त्यांना सन्मानपत्र दिले. गोदाकाठ महोत्सवात उत्कृष्ट आयोजन, निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षेच्या चांगल्या उपाय योजनांबद्दल बचत गटाच्या महिलांनी समाधान व्यक्त करून पुढील वर्षी पुन्हा येण्याचा संकल्प करून गोदाकाठ महोत्सवाचा निरोप घेतला.

खाऊ गल्लीत तयार होणाऱ्या सर्वच पदार्थाचा सुगंध गोदाकाठ महोत्सवात सर्वत्र पसरला असल्यामुळे नागरिकांचे पाय आपसूकच खाऊ गल्लीकडे वळत होते. त्यामुळे खाऊ गल्लीला पाय ठेवायला देखील जागा नव्हती. याला आ. आशुतोष काळे व सौ.चैतालीताई काळे देखील अपवाद राहिल्या नाही.त्यांनी देखील बचत गटाच्या महिलांचा गौरव करतांना विविध पदार्थाची चव चाखण्याचा मोह हे दाम्पत्य आवरू शकले नाही. त्यांनी देखील विविध स्टॉलवर जावून विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करून घेतले.