वडगांव येथे श्री शनैश्वर महाराज यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०९ : कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी दि.१० व ११ जानेवारी २०२४ रोजी श्री शनैश्वर महाराजांचा यात्रोत्सव आयोजित करण्यात आलेला असून यानिमित्त दोन दिवस अनेक धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

वडगाव येथे गोदावरी नदीच्या काठावर श्री शनैश्वराचे भव्य व पुरातन मंदीर आहे. वडगाव व शेजारील बक्तरपूर, चासनळी, मंजूर, मोर्विस, हंडेवाडी, कारवाडी, धामोरी याशिवाय सिन्नर तालुक्यातील सांगवी, सोमठाणे, दहिवाडी, कानळद, कोळगाव, खेडलेझुंगे या गावांतील नागरीकांचे श्री शनैश्वर महाराज हे श्रध्दास्थान आहे. बुधवार दि.१० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शनैश्वराच्या रथाची मिरवणूक निघाणार असून यावर्षी या रथाचा मान सिन्नर तालुक्यातील सांगवी ग्रामस्थांना मिळालेला आहे.

सायंकाळी ७ वाजता शोभेच्या दारुचे मनमोहक काम दाखविण्यात येणार आहे. तर रात्री ९ वाजता अश्विनी-शिवानी बोरगावकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे. तर गुरुवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शनैश्वर महाराजांसमोर हजेरीचा कार्यक्रम होणार असून दुपारी ३ वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे. कुस्ती विजेत्यांसाठी हजारो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. रात्री ९ वाजता शकुंतला चव्हाण यांच्या लोकनाट्यासह इतर कलाकारांचे विविध कार्यक्रम होणार आहेत.

यात्रोत्सवानिमित्त दोन दिवस मंदिराच्या परिसरात मिठाई, खेळणी, कापड दुकानांसह फुल-हारांची व धार्मिक साहित्यांची दुकाने लागलेली असतात. खरेदीसाठी बालगोपाळांसह वडीलधाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेक भाविक दोन दिवस मुक्कामी राहून श्री शनैश्वरावरील आपली श्रध्दा व्यक्त करतात. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वडगाव बक्तरपूर परिसरातील ग्रामस्थांनी केले.