आमदार काळेंनी राज्य मार्ग ७ च्या कामाची केली पाहणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : कोपरगाव मतदार संघाच्या पश्चिम भागातील अतिशय महत्वाच्या असणाऱ्या राज्य मार्ग ७ ची दुरावस्था झाल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी १० कोटी निधी दिला आहे. या निधीतून सुरु असलेल्या कामाची आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी करून सबंधित ठेकेदाराला रस्त्याच्या कामाबाबत सूचना दिल्या.

कोपरगाव मतदार संघातील मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनेक खराब रस्त्यांमध्ये पश्चिम भागातील रा.मा.७ वरील मोर्विस सात मोऱ्या जिल्हा हद्द ते शहाजापूर रस्ता या रस्त्याचा देखील समावेश होता. हा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे या राज्य मार्गाच्या लगत असणाऱ्या अनेक गावातील रस्त्याच्या लगत असणाऱ्या व्यवसायिकांचे व्यवसाय थंडावले होते. खराब रस्त्यांचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे नागरिकांनी या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती.

त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्यासाठी १० कोटी निधी दिला आहे. या निधीतून या रस्त्याचे काम सुरु असून हे काम मागील काही दिवसांपासून रेंगाळल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी स्वत: या रस्त्याच्या कामाची पाहणी करून सबंधित ठेकेदाराला रस्त्याच्या कामाबद्दल कडक शब्दात सूचना करून कामाचा दर्जा राखण्याच्या व रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे, संचालक सचिन चांदगुडे, गौतम सहकारी बँकेचे संचालक कमलाकर चांदगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे विभागीय सचिव सुनील गाडे, सुरेश चांदगुडे, देवीदास कासोदे, धनंजय गाडे, राहुल चांदगुडे, मदन गाडे, गणेश आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्षराज शिंदे आदी उपस्थित होते.