योग्य व्यासपीठ मिळाले तर, करिअर घडते – प्रा बिटाळ

शेवगाव प्रातिनीधी, दि.१८ :  योग्य व्यासपीठ मिळाले की करिअर घडते. अन करिअर घडले तर मोठे स्थानलिलया प्राप्त करता येते. त्यातून नविन नेतृत्व तयार होते. याची सुरुवात शालेय जीवनापासून होते. असे प्रतिपादन काकडे शैक्षणिक स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ यांनी केले.

तालुक्यातील चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोनेसांगवीचे सरपंच रामकिसन मडके, उपसरपंच विकास शिरसाठ, प्राचार्य अरुण वावरे, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, छाया त्रिंबके, उज्वला मुंदडा, प्रतिभा गोरे, गीतांजली पालवे, अर्चना दहिफळे, आरती पातकळ, संगिता सांगळे, जिजाबाई जाधव, पत्रकार शहाजी जाधव, सत्तार शेख, नवनाथ लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.     

प्रा.बिटाळ म्हणाले, शिकूनही नोकरी मिळत नाही. हे म्हणणे पटत नाही. आपणात कौशल्य असेल तर आपली जागा निश्चीत असते. स्वतःचे भविष्य स्वतःच घडवा त्यासाठी कठोर मेहनत घ्या असे आवाहन त्यांनी शेवटी केले. चापडगाव विद्यालयाचा आलेख दिवसेनदिवस वाढत आहे. मी याच शाळेचा  विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. 

प्रमुख अतिथी, सरपंच रामकिसन मडके म्हणाले, विद्यार्थ्याना स्फूर्ती मिळवण्याचे व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन होय. यानिमित्ताने संपन्न झालेल्या रांगोळी प्रदर्शन, मेहंदी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, क्रीडा महोत्सव आदी प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. अरुण वावरे यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब ज्योतीक, सर्जेराव निकाळजे यांनी सुत्र संचलन केले, तर गणेश मोरे यांनी आभार मानले.