सोहळा अयोध्येत, पण कोपरगावच्या मंदिरांचे कळस झाले चकाचक 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : प्रभु रामचंद्रांची नगरी असलेल्या अयोध्येत श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा जसाजसा जवळ येतोय तसतसे कोपरगाव शहरातील मंदिरांचे कळस चकाचक होत आहे. केवळ मंदिरांचे कळसच नाही, तर संपूर्ण मंदिरे पाण्याने स्वच्छ करण्याची मोहीम कोपरगाव नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. कधी नव्हे ती इतकी स्वच्छता मोहीम सुरु असल्याने नागरीकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

यापूर्वी केवळ रस्ते गटारीची साफसफाई केली जात होती. माञ, आता प्रथमच रस्ते गटारी बरोबर शहरातील तब्बल १२४ छोट्या मोठ्या मंदीरांना पाण्याने स्वच्छ धुवून काढले जात आहे. धुळीच साम्राज्य असलेल्या कोपरगावमध्ये मंदिरांचा रंग धुळीत मिसळून गेला होता. माञ, पालिका प्रशासनाने मंदिरांची स्वच्छता सुरु केली आणि चमत्कार घडला मंदिरांचा रंग उजळला.

या संदर्भात अधिक माहिती देताना मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले की, अयोध्येतील राम मंदीर सोहळ्याचा एक मुख्य भाग म्हणून देशासह जगात मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचंच एक भाग म्हणून नगरपालिका हद्दीतील मंदिरांची स्वच्छता सुरु करण्यात आली आहे. केवळ मंदिरांचीच स्वच्छता नाही. तर १४ ते २२ जानेवारी या दरम्यान पालिका प्रशासनाच्यावतीने १२४ मंदिरे, त्या भागातील नागरीकांच्या मदतीने तो परिसर स्वच्छ करणे, विविध ठिकाणचे स्मारके, महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करुन त्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

शहरातील मुख्य रस्ते, रस्त्याशेजारील झाडे, पाण्याने स्वच्छ धुवून चकाचक करण्याची मोहीम सुरु आहे. यासाठी पालिकेचे तब्बल २५० कर्मचारी राञंदिवस काम करीत आहेत. प्रभाग निहाय स्थानिक लोकसहभागातून स्वच्छतेला सहकार्य मिळत आहे. त्या त्या भागातील परिसर व मंदिरे स्वच्छ होत आहेत.

रस्ते, मंदीर, स्मारके, महापुरुषांचे पुतळे, खुले मैदाने, शासकीय कार्यालये व सामुदायिक ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना बरोबर २ पाण्याचे टॅंकर, ४ ट्रॅक्टर, डंपर, अशी यंञणा सज्ज ठेवली आहे. २२ जानेवारीला दिवाळी पेक्षा अधिक तेजोमय कोपरगाव शहर होणार आहे. सडा, रांगोळ्यांसह कोपरगाव राममय होणार आहे. उत्सव अयोध्येत असला तरी अयोध्या नगरी सारखे कोपरगाव सजले जाणार अशी माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली. 

शहर स्वच्छतेत कोणतीही कमतरता राहणार नाही. यासाठी आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण हे डोळ्यात तेल घालुन महा स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण आरोग्य यंञणा या स्वच्छता मोहीमेत रमले आहे. अयोध्येत नव्या मंदीरात पाचशे वर्षांनी प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते. त्याचा थेट महीमा कोपरगावच्या स्वच्छतेवर झाला. अनेक दिवस धुळीने माखलेले मंदिरे, स्मारके, आता उजळत आहेत. श्री रामांचा महिमा हा काय प्रशासनावर व नागरिकांवरही राहो.