कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : अयोध्येत येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आत्मा मालिक ध्यानपीठ, कोकमठाण व समस्त श्रीरामभक्त, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित श्रीरामरक्षा स्तोत्र सामुदायिक पठण व श्रीराम महाआरती सोहळा शनिवारी (२० जानेवारी) सकाळी अनेक संत-महंतांसह कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे व हजारो श्रीरामभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. ‘श्री राम जय राम जय जय राम’ च्या अखंड जयघोषाने संपूर्ण कोपरगाव नगरी दुमदुमली होती. अतिशय भारावलेल्या व भक्तिमय वातावरणात कोपरगावच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या अभूतपूर्व भव्य-दिव्य सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कोपरगाव येथील तहसील कार्यालयाशेजारील मैदानावर झालेल्या या नेत्रदीपक सोहळ्यास आत्मा मलिक ध्यानपीठाचे सदगुरू संत प. पू. परमानंद महाराज, विवेकानंद महाराज, निजानंद महाराज, चंद्रानंद महाराज, राजनंद महाराज, चांगदेव महाराज, सत्पात्रानंद महाराज, प्रेमानंद महाराज, शेलार महाराज, भोलेनाथ महाराज, अशोक महाराज, कुंभारीचे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज, सुरेगावचे गोवर्धनगिरी महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला, कोपरगाव गुरूद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजीतसिंग, राजयोगिनी ब्र. चैताली यांच्यासह खास पोलंडहून आलेले परदेशी भाविक उपस्थित होते.
श्रीरामभक्त म्हणून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या सर्व संत-महंतांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच कारसेवक शंकर कडू, श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निमंत्रण समितीचे तालुकाप्रमुख नीलेश जाधव, कोपरगाव गुरूद्वारा समितीचे सेवासिंग सहानी, स्वच्छतादूत सुशांत घोडके आदींचा त्यांनी सन्मान केला.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पाचशे वर्षांनंतर असंख्य कारसेवकांच्या बलिदानातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नातून अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत भव्य श्रीराम मंदिर उभे राहिले असून, या मंदिरात २२ जानेवारीला होणारा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा आपल्या सर्वांसाठी अतिशय भाग्याचा व ऐतिहासिक सोहळा आहे. या सोहळ्याची जगभरात उत्कंठा लागली आहे. यानिमित्ताने कोपरगावच्या पवित्र भूमीत होत असलेला दैदिप्यमान असा श्रीरामरक्षा स्तोत्र सामुदायिक पठण सोहळा सर्वांच्या कायम स्मरणात राहील.
अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावात श्रीरामरक्षा स्तोत्र सामुदायिक पठण सोहळा यशस्वी करण्यासाठी स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूह, कोपरगाव गुरूद्वारा समिती, विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ, बजरंग दल, शीख व पंजाबी समाजबांधव, सर्व श्रीरामभक्त आदींनी विशेष सहकार्य केल्याबद्दल संत प. पू. परमानंद महाराज यांनी या सर्वांचे आभार मानून सर्वांना श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा यांचे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान असून, आई-वडिलांइतकेच साधू-संतांचे आशीर्वाद मोलाचे आहेत. संत-महंत आपले आयुष्य धर्मासाठी व देशासाठी समर्पित करून तरुण पिढी घडविण्याचे मोठे काम करीत आहेत. आपले आचार, विचार, संस्कार चांगले असतील तर आपला भारत देश प्रगतीच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ असून, ती आपण सर्वांनी जोपासली पाहिजे. आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असू तर आपण जीवनात खूप काही चांगले करू शकू म्हणूनच ‘मन चंगा तो कठौती में गंगा’, ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे म्हटले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू चरणी लीन होऊन संत-महंतांचे आशीर्वाद घेऊन देशाचा कारभार अत्यंत उत्तम रीतीने पाहत आहेत. ते परदेशात गेल्यावर तेथील मंदिरांमध्ये जाऊन देवाची भक्ती करतात. यातून आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा नागरिकांनी मंदिरांमध्ये स्वच्छता करून, घरोघरी रांगोळी काढून, श्रीराम दीप लावून, गोडधोड जेवण करून दिवाळी सणासारखा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. विश्वात्मक सद्गुरू जंगलीदास माऊलींच्या मार्गदर्शनाखाली आत्मा मालिक ध्यानपीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
संत प. पू. परमानंद महाराज म्हणाले, प्रभू श्रीराम हे कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत असून, अयोध्येत २२ जानेवारीला होणारा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा अद्भुत सोहळा केवळ भारत व आशिया खंडच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद आहे. आपण सर्व श्रीरामभक्त या सोहळ्याचे साक्षीदार होत आहोत हे आपले परमभाग्य आहे. या सोहळ्यानिमित्त कोपरगावच्या पावन भूमीत हजारो रामभक्तांनी श्रीरामरक्षा स्तोत्राचे सामुदायिक पठण करून प्रभू श्रीरामाचा जागर केला. सद्गुरू जंगलीदास महाराज यांच्या संकल्पनेतून आज झालेला हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे.
संत, महंतांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात आत्मा मालिक गुरुकुल व शैक्षणिक संकुलातील २१०० विद्यार्थी-विद्यार्थिनी व हजारो श्रीरामभक्तांनी सामूहिकरीत्या श्रीरामरक्षा स्तोत्र सामुदायिक पठण करून प्रभू श्रीरामाची महाआरती केली. स्नेहलता कोल्हे व उपस्थित संत-महंतांच्या हस्ते प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, सदगुरू जंगलीदास महाराज, गुरू नानकदेव, गुरू गोविंदसिंग यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. संजीवनी उद्योग समूहातर्फे काढण्यात आलेल्या प्रभू श्रीराम व अयोध्येतील श्रीराम मंदिराचे सुंदर छायाचित्र असलेल्या दिनदर्शिका-२०२४ चे प्रकाशन यावेळी संत-महंताच्या हस्ते करण्यात येऊन श्रीरामभक्तांना प्रसादासोबत त्यांचे वाटप करण्यात आले.
आत्मा मालिक गुरुकुलातील संगीत शिक्षक वसंत नारद व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रभू श्रीराम स्तुतीपर भजन व गीतांमुळे वातावरण राममय झाले होते. सूत्रसंचालन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले. या कार्यक्रमास संत जंगलीदास महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील शिक्षक, संजीवनी उद्योग समुहाशी संलग्न विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, भाजप, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, श्रीरामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.