राधाकृष्ण विखे यांच्या समवेत आमदार काळेंनी केली मंदिर सफाई

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : सोमवार (दि.२२) रोजी अयोध्येत होत असलेल्या श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिवसेंदिवस शिगेला पोहोचला असून या दिवशी आपापल्या परिसरातील मंदिरांची साफ सफाई करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या समवेत आ. काळे यांनी कोपरगाव शहरातील मंदिरात साफ सफाई केली.

मागील पाचशे वर्षापासून ज्या सोहळ्याची देशभरातील तमाम श्रीराम भक्त वाट पाहत होते. ती आतुरता संपली असून अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशाचे वातावरण राममय झाले असून प्रत्येक शहरात आणि गावा गावात धार्मिक कार्यक्रम व मंदिरांची साफ सफाई करण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केले आहे.

प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त समस्त कोपरगावकरांच्या वतीने रविवार (२१) रोजी सायंकाळी ०४ वाजता विघ्नेश्वर चौक येथून भगवा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये बहुसंख्येने कोपरगावकरांनी सहभागी व्हावे. तसेच सोमवार (दि.२२) रोजी सायंकाळी ०६ वाजता गोदावरी मातेची महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर लेझर शो, भजन संध्या, फायर शो तसेच रॉक बँड म्युझिकल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. -आमदार काळे

त्या आवाहनाला प्रतिसाद देवून कोपरगाव दौऱ्यावर आलेल्या राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी देखील कोपरगाव शहरात महापुरुषांना अभिवादन करुन शहरातील मंदिरात साफ सफाई केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत आ. काळे यांनी देखील मंदिरात साफ सफाई केली. यावेळी कोपरगाव शहरातील अनेक मान्यवरांसह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ना. राधाकृष्ण विखे यांनी कोपरगाव शहरात आ. काळे यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगाव शहरातील वातावरण श्रीराममय करून टाकल्याबद्दल आ. काळे यांचे कौतुक केले. पाचशे वर्षानंतर आलेला हा ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळा नागरिकांनी दिवाळी सारखा मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन आ. काळे यांनी केले.