कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरांना भेट देऊन प्रभू श्रीरामांचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाची महाआरती केली. ‘जय श्रीराम’ चा नारा देत प्रभू श्रीरामचरणी लीन होऊन त्यांनी श्रीराम नामाचा जागर केला. अयोध्येतील ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना भेटी देऊन प्रभू श्रीरामांना वंदन केले व सर्व रामभक्तांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
स्नेहलता कोल्हे यांनी सोमवारी सकाळी कलावती नितीन कोल्हे यांच्यासमवेत धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संवत्सर परिसरातील दशरथवाडी येथील श्री गुरुदत्त मंदिरास भेट देऊन श्री गुरुदेव दत्ताची आरती करून पूजन केले. यावेळी मंदिरात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी टाळ वाजवून देवाची आराधना केली. त्यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव बेट येथील श्रीराम मंदिर, सदगुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे जाऊन मनोभावे आरती करून दर्शन घेतले.
श्री शुक्राचार्य महाराजांची आरती केल्यानंतर त्यांनी श्रीराम, लक्षण व सीता मातेचे पूजन केले. यावेळी श्री शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, मंदिरप्रमुख सचिन परदेशी, मंदिर उपप्रमुख प्रसाद पऱ्हे, व्यवस्थापक राजाराम पावरा, अरुण जोशी, जयप्रकाश आव्हाड आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील श्रीराम मंदिर, बाजार तळ भागातील तुळजा भवानी मंदिर, जलाराम मंदिर, दत्त पार येथील श्रीराम मंदिर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, श्री साईबाबा मंदिर, हनुमाननगर भागातील श्री हनुमान मंदिर आदी विविध ठिकाणी भेट देऊन पूजा व आरती केली. कोपरगाव मतदारसंघासह देशातील सर्व नागरिकांचे दु:ख दूर होऊन त्यांना सुख, समृद्धी लाभो, अशी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करून कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजसेवेसाठी आणखी शक्ती मिळावी यासाठी त्यांनी प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेतले.
शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीतामातेचे पूजन व आरती केल्यानंतर त्यांनी भाविकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोल्हे यांनी मंदिर परिसरातील कचरा स्वत:च्या हाताने उचलून स्वच्छता केली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली. या ऐतिहासिक घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होता आले नसले तरी कोपरगाव शहर व तालुक्यासह देशाच्या अन्य भागात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हा सोहळा अतिशय आनंदात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
कोपरगाव शहर व तालुक्यात सगळीकडे दिवाळीसारखेच उत्साही व मंगलमय वातावरण होते. विविध ठिकाणी असलेली श्रीराम मंदिरे व इतर मंदिरे आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती. चौका-चौकात, गावा-गावात प्रभू श्रीरामांच्या मूर्ती, भव्य कटआऊट प्रतिकृती, भगवे झेंडे, पताका लावण्यात आल्यामुळे सर्वत्र ‘राम’ मय वातावरण दिसत होते. स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या आवाहनानुसार श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी श्रीराम नाम संकीर्तन, भजन, आरती, महाप्रसाद वाटप आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
तसेच घरोघरी रांगोळ्या काढून, दिवे-पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. स्नेहलता कोल्हे यांनी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आराधना केली. त्याचबरोबर विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना भेट देऊन प्रभू श्रीरामांची महाआरती करून सर्वांना श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. गोदाम गल्ली भागात व्यापारी बांधवांनी प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या श्रीराम पूजन कार्यक्रमाला भेट देऊन पूजन करून दर्शन घेतले.