शेवगावात सुशिक्षित बेरोजगार मेळावा

शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ : महाराष्ट्र राज्य जनहित सुशिक्षित बेरोजगार युवक संघर्ष समिती आयोजित शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा मेळावा नाबार्डचे पुणे येथील रिजनल जनरल मॅनेजर प्रदीप पराते यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पंचायत समिती सभागृहामध्ये नुकताच पार पडला.

यावेळी पराते म्हणाले, केंद्रीय व राज्य पातळीवरील विविध क्षेत्रातील नोकऱ्या हा विषय जवळपास संपुष्टात आला असल्याने व दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असल्याने आता येथून पुढच्या काळात प्रत्येक तरुणाने उद्योग व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या स्थानिक बँकासह जिल्हा उद्योग केंद्र व नाबार्डशी संपर्कात राहून वेगवेगळा उद्योग व्यवसाय निवडून तो चिकाटीने करत राहिल्यास त्यामध्ये निश्चित यश प्राप्त होऊ शकते.

या कामी स्थानिक बँके बाबत काही अडचणी आल्यास नाबार्डशी संपर्कात राहिल्यास तुमचे सर्व प्रश्न सुटण्यास मदत होईल. यावेळी नाबार्ड बँकेचे मॅनेजर श्रीपाद पिवळटकर, बबन सोनवणे, डॉ.भास्कर रणनवरे, जिल्हा सहकारी बँकेचे भारत सोले, शिवाजी भोसले, प्रल्हाद शिंदे यांनी ही आपले विचार व्यक्त करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत कर्डक, नवनाथ चव्हाण, त्रिंबक भोसले, विक्रम बल्लाळ, संतोष पवार, उपस्थित होते. अंबादास आरोळे अध्यक्ष स्थानी होते.

प्रास्ताविक पवनकुमार साळवे यांनी केले असून सूत्रसंचालन संतोष पटवेकर व प्रथमेश सोनवणे यांनी केले. तर आभार बाळू घाटविसावे यांनी मानले. या मेळाव्याला शेवगाव व पाथर्डी तालुक्यातून सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.