के.जे.सोमैया महाविद्यालयात करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नुकतीच करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्केटिंग मॅनेजमेंट या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास मालकर, रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल चे अध्यक्ष राकेश काले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव आदि मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी डॉ. विकास मालकर यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अत्यंत उज्वल असुन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध तंत्रे व कौशल्य आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन केले. रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना खुणावत असल्याचेही त्यांनी नमुद केले.

रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल चे अध्यक्ष मा. राकेश काले यांनी रोटरी क्लब द्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना रोटरी क्लबच्या वतीने आयोजित या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात निश्चित भर पडेल असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महारुद्र खोसे यांनी तर आभार डॉ. वसुदेव साळुंके यांनी मानले. सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.