तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवडणूक शाखेचा पुरस्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ :  शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी त्यांच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे निवडणुक शाखेचे अतिशय चांगले काम केले. त्याबद्दल त्यांना नुकताच जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट सहाय्यक मतदार अधिकारी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून सांगडे यांचा गौरव केला आहे.

येथील तहसील कार्यालयातील १२७ कार्यालयीन सेवका पैकी महत्त्वाच्या पदांपैकी ३ नायब तहसीलदार, ११ लिपिक व १६ तलाठ्याची अशी एकूण ३५ पदे रिक्त असताना या सर्वाकडून तालुक्याचे कामकाज सुरळीत तर ठेवलेच शिवाय आदर्श असे नोंद घेण्या सारखे कामकाज देखील त्यानी केले आहे.

गेल्या दोन वर्षापासून निवडणूक शाखेला नायब तहसीलदार नाहीत. सांगडे यांना येऊनही अवधे पाच महिने झाले आहेत. तरीही या अल्प काळात देखील त्यांनी असलेल्या सेवकांना समवेत घेऊन, प्रोत्साहित करून काम करवून घेतले आहे.

त्यासाठी त्यांनी जातीने लक्ष घालून वेळ दिल्यामुळे शेवगाव तालुक्यात मतदाराच्या घर ते घर सर्वेक्षणावर जोर देऊन पाच हजार मयत मतदारांची नावे तसेच दुबार असलेलीही अनेक नावे मतदार याद्यातून कमी केली. या व्यतिरिक्त दिव्यांग बांधव आणि वयोवृद्ध ८० वर्षावरील जेष्ट नागरिकांच्या स्वतंत्र मतदार याद्या करून दहा हजार नव मतदारांची नोंदणी केली आहे. या विशेष कामगिरीबद्दल तहसीलदार सांगडे यांना गौरविण्यात आले आहे.