कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी ईश्वरी संदीप बोरनर या विदयार्थीनीने उत्कृष्ट कामगिरी केली असून अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात ईश्वरी कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
राधाबाई काळे कन्या विद्यालयात दि. ०२ ते ०४ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलच्या ईश्वरी संदीप बोरनर हिने इयत्ता ९ वी ते १२ वी विज्ञान गटातून प्रथम क्रमांक पटकावला. ईश्वरीने मल्टी युटीलिटी किचन मशीन हे उपकरण तयार करून प्रदर्शनात त्याचे उत्तम सादरीकरण केले.
ईश्वरीने तयार केलेल्या या एकाच मशिनद्वारे स्वयंपाक घरातील विविध कामे सहजपणे व कमी वेळात होतात. दि. १ ते ३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलची ईश्वरी कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असून गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे यांनी ईश्वरीचे अभिनंदन करून तिला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ईश्वरीला हे उपकरण तयार करणे व उत्तम सादरीकरणासाठी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पब्लिक स्कूलचे गणित व विज्ञान प्रदर्शन प्रमुख राजेंद्र आढाव, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, सायन्स डिपार्टमेंटच्या प्रतिभा बोरनर, वैशाली उंडे, सुनील सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोक काळे, संस्था सदस्य व कोपरगाव तालुक्याचे आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैताली काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी ईश्वरीचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.