कोपरगावचे शेतकरी तीन वर्षापासुन गाय गोठा अनुदानापासून वंचित – राजेंद्र वैराळ 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : तालुक्यातील बहुसंख्य गावातील शेतकरी शासनाच्या गाय गोठा अनुदानापासुन वंचित आहे. हे सर्व लाभार्थी तालुका पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून थकले आहेत. अधिकारी साचेबध्द उत्तरे देवुन शेतक-यांची चेष्टा करतात अशी तकार वेळापुर येथील लाभार्थी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चांगदेव वैराळ यांनी केली आहे. 

ते म्हणाले की, तालुक्यातील वेळापुर परिसरातील चार लाभार्थ्यांचे गाय गोठा अनुदान प्रकरणे कागदपत्रांची पुर्तता करून तीन वर्षे उलटुन गेले तरीही अद्याप या शेतक-यांना यातील अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. आठवडेबाजार सोमवारच्या दिवशी हे सर्व गरीब शेतकरी थेट वेळापुर येथुन कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात येतात. पण त्यांच्या पदरी निराशा पडते.

संबंधीत अधिकारी एक दोन दिवसात जमा होईल असे थातुरमातुर उत्तरे देवुन शेतक-यांची चेष्टा करीत आहेत. या अधिका-यांचे एक दोन दिवस म्हणजे तब्बल तीन वर्षे झाली. पण अजुनही शेतक-यांना गाय गोठा अनुदान मिळालेले नाही. तालुक्यातील उर्वरीत गावातील लाभार्थी शेतक-यांचीही अशीच अवस्था आहे असे ते म्हणाले.