संतांचे तत्वासह विचार ही आचरणांत आणा – रामनाथ पवार महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ :  संत समाजाला नेहमीच चांगले उपदेश करतात, जळी, स्थळी, काष्टी सर्वत्र परमेश्वराचा अंश भरलेला आहे. जगातील सर्वोच्च तीर्थ संतांच्याच चरणाजवळ आहे तेंव्हा त्यांच्या तत्वासह विचारांचे प्रत्येकांने आचरण करावे असे प्रतिपादन काळभैरवनाथ देवस्थान बहिरवाडी येथील ह. भ. प. रामनाथ महाराज पवार यांनी केले.

तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळयानिमीत्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन बुधवारी त्याचे चौथे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. ह. भ. प. रामनाथ महाराज पवार यांनी किर्तनसेवेसाठी संत तुकाराम महाराजांचा अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा हा अभंग निवडला होता. त्यावर मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले की, कलियुगात परमेश्वराच्या नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही आम्ही सगळे परमेश्वराचे अंश आहे.

सेवेतच संतोष असतो ती केली नाही तर जीवनांत असंतोष वाढत जातो, ईश्वर आणि भक्त या दोघामधील भक्तीचे अलिंगन जीवन जगण्याचे मार्गदर्शन करत असते. जीवनांत कितीही अडथळे आले तरी ईश्वर सेवा प्रत्येकांने केलीच पाहिजे. त्यातुन पुण्याचा साठा वाढत जातो. कोकमठाण पंचक्रोशीच्या तीनखणीत ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी अलौकीक उर्जेतुन भाविकांना भक्तीचा मार्ग दाखविला.

त्यामुळे अनेकांचे जीवन कृतार्थ झाले आहे. या संत महंतांचा सहवास कोकमठाणसह विश्वाला घडला हे तुम्हां आम्हां पूर्व पुण्याईचे प्रतिक आहे असेही ते म्हणाले. रामदासीबाबा भक्त मंडळ व त्यांचे सर्व सहकारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहे. राहता तालुक्यातील पिंपळस येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख ह. भ. प. संतोष महाराज दीक्षित यांच्या टाळकरी मुलांचे विशेष कौतुक होत आहे. त्यांचा २५ मुलांचा संच दररोज कीर्तनात हजेरी देत आहे.