कोपरगाव वकील संघाच्या साखळी उपोषणास स्नेहलता कोल्हे यांचा पाठिंबा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०३ : अहमदनगर जिल्ह्यातील मानोरी (ता. राहुरी) येथील ॲड. राजाराम जयवंत आढाव व ॲड. मनीषा राजाराम आढाव या दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच वकिलांवरील हल्ले थांबविण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तातडीने मंजूर करावा, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडे केली आहे. साखळी उपोषण करणाऱ्या कोपरगाव वकील संघाच्या वतीने सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाला वकील बांधवांची भेट घेऊन या आंदोलनास कोल्हे यांनी पाठिंबा दिला असून तातडीने वकील सुरक्षा हेतूच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची भावना व्यक्त केली आहे.

एक क्रूर घटना घडली असून वेदना दायक घटना आहे. समाजासाठी लढणाऱ्या वकिलांचे मानसिक खच्चिकरण होऊ देणाऱ्या प्रवृत्ती घातक असून वकिलांच्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. स्नेहलता कोल्हे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव (दोघेही रा. मानोरी) यांची २५ जानेवारी २०२४ रोजी मानोरी येथे निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळिमा फासवणारी असून, या हत्याकांडाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत.

या घटनेबाबत वकील संघटनांनी राज्यभर साखळी उपोषण, मोर्चे आदी मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. सदर घटना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. ॲड. राजाराम आढाव व ॲड. मनीषा आढाव यांच्या हत्येची तातडीने सखोल चौकशी होऊन संबंधित गुन्हेगारांना कडकडीत शिक्षा होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालावे. या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून सदर खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या वेळी स्नेहलता कोल्हे यांनी तत्काळ ॲड.आशिष शेलार यांच्याशी वकील संघाचा संपर्क करून देत सदर घटनेची दखल घेण्यासाठी ॲड.प्रोटेक्शन ॲक्ट लागू होण्यासाठी आग्रहाची मागणी केली. ॲड.जयंत जोशी यांनी सदर परिस्थिती शेलार यांना अवगत करून दिली त्यावर त्यांनी यात विशेष लक्ष घालणार आहे असे सांगितले.

वकील हे न्यायपालिकेचे महत्त्वाचे घटक आहेत. न्यायालयीन कामकाजात वकिलांची भूमिका महत्त्वाची असून, वकील हे पक्षकार व न्यायालय यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. सर्वसामान्य जनतेस न्याय देण्याचे काम वकिलांमार्फत केले जाते. मोफत कायदेविषयक शिबिरामार्फत समाजात कायद्याबाबत जागृती करण्याचे काम होत आहे. मानोरी येथील ॲड. आढाव दाम्पत्याच्या हत्येमुळे वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वकील बांधवांना संरक्षण मिळण्यासाठी व त्यांच्यावरील हल्ले थांबविण्यासाठी वकील संरक्षण कायदा (ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट) लागू होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने तातडीने योग्य कार्यवाही व्हावी, असेही कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.

या प्रसंगी कोपरगाव बार असो.अध्यक्ष ॲड.मनोहर येवले, उपाध्यक्ष शरद गव्हाणे, ज्येष्ठ विधीज्ञ एस.एम वाघ, विधीज्ञ एस. डी.कुलकर्णी, ए.जी देशमुख, ॲड.मच्छिंद्र खीलारी, ॲड.जयंत जोशी, ॲड.वहाडणे, एम.पी.गुजराथी, ॲड.विद्यासागर शिंदे, ॲड.देवकर, अतिश आगवन, ॲड.महेश भिडे, मुन्ना सय्यद, एस.एस. डागा, ॲड.धोर्डे, ॲड.ज्योती भुसे, ॲड.देशमुख, ॲड.प्रेरणा पटणी, ॲड.शिंदे, ॲड.लोढा, वकील शादाब शेख, वकील योगेश खालकर, वकील नितीन पोळ, वकील शरद गुजर, वकील गणेश मोकळ, ऍड.भास्कर गंगावणे, ॲड.अनुप ठोळे, ॲड.दीपक पवार, ॲड.काटकर, योगेश जाधव, ॲड.भाकरे, ॲड.लोहकने, बाबसाहेब सोनवणे, ॲड.नितीन खैरनार आदींसह असंख्य वकील बांधव भगिनी उपस्थित होते.