ऐतिहासिक मोडी लिपीची गरज – प्रा.किरण पवार

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०३ :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक मोडी लिपी लेखन व वाचन जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख विशाल पोटे यांनी प्रास्ताविक करतांना विद्यार्थ्यांना ऐतिहासिक मोडी लिपी आणि भाषा यांच्यातील साधर्म्य पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते उपस्थित असलेले एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. किरण पवार यांनी ऐतिहासिक मोडी लिपीचा उगम आणि मोडी लिपीचे महत्व सांगतांना आजचा विद्यार्थी या मोडी लिपी पासून दूर असल्याची खंत व्यक्त केली. ऐतिहासिक मोडी लिपीची अभ्यासक्रमात गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, मोडी लिपीस इतिहास आहे. जो विद्यार्थी किंवा व्यक्ती इतिहास समजावून घेत नाही त्याची प्रगती होणे शक्य नाही. या ऐतिहासिक मोडी लिपीतून भविष्यात खूप संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यशाळेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील बहुसंख्य महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमाकांत कदम यांनी केले. आभार विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. सिकंदर शेख यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापीका पल्लवी मोरे, प्रा.डॉ.राजेंद्र चव्हाण, प्रा.डॉ.सुनीता शिंदे, प्रा.डॉ.हरिभाऊ बोरुडे, प्रा.सोमनाथ खरात, प्रा.किशोर पवार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.