ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०४ : राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण करून केलेली हत्या निषेधार्थ असून वकील बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. यापुढे अशा घटना घडू नये यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राहुरी न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यादाम्पत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा समाजातील सर्वच घटकांकडून निषेध करण्यात येत असून राज्यभरातील वकील संघाकडून देखील निषेध नोंदवून आंदोलन केली जात आहे. त्याप्रमाणे कोपरगाव वकील संघाच्या वतीने देखील निषेध नोंदवून वकील बांधवांच्या सुरक्षेसाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू करावा. यासाठी साखळी उपोषण केले जात आहे. या आंदोलनस्थळी आ.आशुतोष काळे यांनी भेट देवून वकील बांधवांशी चर्चा केली यावेळी ते बोलत होते.

राहुरीच्या वकील वकील दाम्पत्याची करण्यात आलेली निर्घृण हत्या ह्या घटनेचा केवळ निषेध करून चालणार नाही तर अशा प्रवृत्तींना कायमचा धडा शिकवून भविष्यात वकील बांधवांच्या बाबतीत अशा घटना घडू नये यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याबाबत शासनदरबारी निश्चितपणे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.

न्याय मंदिरात नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची करण्यात आली हत्या अत्यंत दुर्देवी असून माझा देखील वकिल बांधवांच्या साखळी उपोषणाला पाठींबा असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी कोपरगाव न्यायालयातील वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.