वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी एक कोटी निधी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी मागील चार वर्षात जवळपास २९०० कोटी निधी मिळविण्यात यश आले असून मतदार संघाच्या विकासाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी करीत असलेल्या पाठ पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी वळूमाता प्रक्षेत्र विकासाच्या स्वनिधीतून ०१ कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातील वळूमाता प्रक्षेत्राचा विकास रखडला होता. या ठिकाणी चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या एकून पाच जनावरांच्या शेडची मोठी दुरावस्था होवून मुख्य गेट देखील तुटलेले होते. काही शेडचे पत्रे फुटल्यामुळे पावसाळ्यात या शेडमध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य राहत होते. त्यामुळे पशु संवर्धन विभागाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीची आमदार काळे यांनी स्वत: पाहणी करून वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी निधी मिळावा यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता.

त्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून वळूमाता प्रक्षेत्र विकासासाठी वळूमाता प्रक्षेत्र विकासाच्या स्वनिधीतून एक कोटी निधी मंजूर केला आहे. या निधीतून वळूमाता आवारातील मुख्य शेड, मिल्क शेड, भाकड शेड, मिल्क पार्लर, दवाखाना, प्रशिक्षण सभागृह, कार्यालय, निवासस्थान बांधकाम, संरक्षण भिंत सुधारणा करण्यात येणार असून त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आमदार काळे यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागला आहे.

या एक कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच या कामाची निविदा देखील प्रसिद्ध होणार आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.