महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदी परजणे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १० : महाराष्ट्र राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) संचालकपदी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत १६ संचालक आधीच बिनविरोध निवडून आलेत. त्यात उर्वरीत महाराष्ट्र विभागातून राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तर पाच जागांसाठी रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी निवडणूक पार पडली. 

राज्यात महासंघाचे सभासद असलेल्या सहकारी दूध संघांपैकी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील सहकारी दूध संघ हा महासंघाला सर्वाधिक दूध पुरवठा करणारा संघ असून महासंघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये राबविलेल्या आहेत. त्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहेत.

परजणे हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष म्हणून सद्या कार्यरत आहेत. याशिवाय अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीसह अर्थ समिती, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशा विविध समित्यांवर त्यांनी काम केलेले असून भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन (आनंद) गुजरात या डेअरीचे संचालक तसेच कॅनरा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. अनेक सहकारी, शासकीय, निमशासकीय संस्थांबरोबरच शिक्षण संस्थांवर ते सथा कार्यरत आहेत. कोपरगांव येथील महिला महाविद्यालय व संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी म्हणून ते सद्या कार्यरत आहेत.

राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या दिल्ली येथील नॅशनल एज्युकेशन अॅन्ड व्हयुमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेने सन २००५ मध्ये त्यांचा राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरव केलेला आहे. नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेनेही गोदावरी दूध संघाच्या प्रगतीत योगदान दिल्याबद्दल  त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने दि. २१ मार्च २०१७ रोजी सन्मानीत केले. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील योगाबद्दल दिल्लीच्याच इकॉनॉमिक ग्रोथ फाउंडेशन या संस्थेनेही एप्रिल २०१८ साली भारत शिक्षारत्न पुरस्काराने त्यांना सन्मानीत केले.

गोदावरी दूध संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडीत असताना संघातील कामकाजात सुसूत्रता आणून आधुनिकीकरणाबरोबरच संगणकीकृत कामकाजाचा नवा पॅटर्न तयार करण्यात श्री परजणे यांनी मोठे योगदान दिलेले आहे. या कार्याची दखल घेतली गेल्याने संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आय. एस. ओ. ९००१-२००० आणि आय. एस. ओ. २२०००- २०१८ ही दोन मानांकने प्राप्त झालेली आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदावर श्री परजणे यांची सलग दुसऱ्यांदा निवड झालेली असून या निवडीबदल दुगधविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, महासंघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रबापू जाधव आदिनी अभिनंदन केले.