राज्यात अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करा – आमदार काळे

कोपारगाव प्रतिनिधी, दि.०७ :– अहमदनगर जिल्ह्यातील आढाव वकील दांम्पत्याची मागील महिन्यात (दि.२५) रोजी निर्घुणपणे हत्या करण्यात आली असून त्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात वकील बांधवांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. वकील बांधवांच्या संरक्षणासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करणे अत्यंत गरजेचे असून राज्यात लवकरात लवकर अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करावा असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना घातले आहे.

मागील महिन्यात राज्याला हादरवून सोडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याच्या हत्येने संपूर्ण राज्यातील वकील बांधव भयभीत होवून या हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील वकील बांधवांचे काम बंद आंदोलन सुरु असून कोपरगाव तालुक्यातील वकील बांधवांच्या वतीने देखील या घटनेचा निषेध नोंदवून काम बंद आदोलन पुकारले आहे. सदर आंदोलनास आ. आशुतोष काळे यांनी भेट देवून पाठींबा दर्शवत अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करावा याबाबत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी वकील बांधवांना दिली होती.

त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची भेट घेवून अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करावा असे साकडे घालत त्यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या वकील दांम्पत्याच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यातील वकील वर्ग हादरला आहे. या घटनेचा राज्यातील वकील बांधवांनी निषेध नोंदवून अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करावा अशी मागणी लावून धरली असून त्यांची मागणी रास्तच आहे. 

राज्यात दिवसेंदिवस वकीलांवरील वाढत असलेले हल्ले न्याय व्यवस्थेसाठीच अतिशय चिंताजनक बाब असून राज्यातील वकीलांचे संरक्षण देण्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे. देशातील इतर काही राज्यांमध्ये अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्यात आलेला असून महाराष्ट्र अॅण्ड गोवा बार कौन्सिल यांचे वतीने महाराष्ट्र शासनाकडे देखील अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्टचा मसूदा सहा महिन्यापूर्वीच सादर केलेला आहे.

एकूण परिस्थितीचा विचार करून सदर मसुद्याचा स्वीकार करून राज्यातील वकीलांना संरक्षन देण्यासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लवकरात लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या वकील दांम्पत्याच्या हत्येची घटना दुर्दैवी असून याची गांभीर्याने दखल घेवून अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्यासाठी त्वरित पावले उचलू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी यावेळी आ. आशुतोष काळे यांना दिली आहे.